नाफेड कांदा खरेदी तत्काळ बंद करा, अजित पवार संतापले
X
राज्यात कांदा प्रश्न चांगलाच तापला आहे. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाफेड खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करून दिलासा देऊ, असं जाहीर केलं होतं. मात्र नाफेडकडून (Nafed) योग्य भाव मिळत नसल्याने अजित पवार यांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे. शेतकऱ्यांनी आपल्या घामातून पिकवलेल्या कांद्या या पिकाला नाफेडकडून सध्या योग्य भाव मिळत नसल्याने तातडीने नाफेड कांदा खरेदी बंद करा, अशी भूमिका अजित पवार यांनी व्यक्त केली.
शेतकरी हा नेहमीच नैसर्गिक कचाट्यात सापडलेला असतो. आता शेतकऱ्याचा कांदा काढणीला आला असून ते विविध ठिकाणी विक्रीसाठी आणला जात आहे. त्यात नाफेडसह व्यापाऱ्यांकडून कांदा कवडीमोल भावाने खरेदी करण्यात येत आहे. त्यामुळे पीक लागवडीपासून तर काढेपर्यंत कर्जाने घेतलेले पैसे कशी परतफेड करावी हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. तत्पूर्वी आम्ही अधिवेशनात कांद्याला हजार रुपये अनुदान देण्याबाबत मागणी केली. त्यावर सरकारने शेतकऱ्यांची थट्टा करण्यासाठी तीनशे रुपये जाहीर केले. आम्ही पुन्हा वाढविण्याबाबत मागणी केली.
परंतु नंतर यात फक्त पन्नास रुपये वाढ करण्यात आली. त्यामुळे हे सरकार खरंच शेतकऱ्यांचा अंत पाहू बगत आहे. तर दुसरीकडे नाफेड व व्यापाऱ्यांकडून कांदा कवडीमोल भावाने खरेदी करत आहे. त्यामुळे नाफेडकडून सुरु असलेले कांदा खरेदी तत्काळ बंद करून शेतकऱ्यांना भरीव अनुदान जाहीर करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. ते आज नाशिक (Nashik) जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना पत्रकार परिषदेत बोलत होते. तसेच पुढे म्हणाले कि, बरेच ठिकाणी ऐकू येत आहे की, कांदा खरेदी केंद्र बंद आहे. याविषयी मी स्वतः मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी संवाद साधणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.