दसरा मेळाव्यावरून निर्माण झालेल्या वादात राष्ट्रवादीची उडी, अजित पवार यांनी सांगितली बाळासाहेबांची आठवण
शिवाजी पार्कवर होणाऱ्या दसरा मेळाव्यावरून राज्यात राजकारण तापले आहे. त्यात आता राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उडी घेतली आहे.
X
शिवाजी पार्कवर ठाकरे गटाचा दसरा मेळावा होणार की शिंदे गटाचा यावरून रस्सीखेच सुरू आहे. त्यातच मनसे नेत्यांनीही राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घ्यावा, अशी विनंती केली आहे. त्यामुळे शिवाजी पार्कवर कुणाचा दसरा मेळावा होणार यावरून राजकारण तापले आहे. त्यातच राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बाळासाहेब ठाकरे यांची आठवण सांगत या वादात उडी घेतली आहे.
राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी सरकार स्थापन केले आहे. मात्र यानंतर शिंदे गटाने आपणच खरी शिवसेना असून बाळासाहेब ठाकरे यांचा विचार पुढे नेत असल्याचा दावा केला आहे. तर दुसरीकडे शिवसेना कुणाची हा वाद निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यापार्श्वभुमीवर दरवर्षी शिवाजी पार्कवर होणाऱ्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरही शिंदे गटाने दावा केला आहे.
शिवसेनेने शिवाजी पार्कवर होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी महापालिकेकडे परवानगी मागितली आहे. मात्र अजूनही महापालिकेने परवानगी दिली नाही. तर शिंदे गटानेही दसरा मेळाव्याची जोरदार तयारी केली आहे. त्यामुळे शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कुणाचा होईल? याकडे संपुर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. त्यापार्श्वभुमीवर अजित पवार यांनी प्रतिक्रीया दिली.
अजित पवार म्हणाले की, परवानगी मागण्याचा अधिकार सर्वांनाच आहे. मात्र महाराष्ट्रातील जनता बघत आहे की, शिवसेनेच्या स्थापनेपासून तिथे बाळासाहेब ठाकरे यांच्या सभा व्हायच्या. त्याबरोबरच बाळासाहेब ठाकरे यांनी शेवटच्या सभेत सांगितलं होतं की, माझ्यानंतर शिवसेना उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली चालेल. पण 20 जूनपासून घडणाऱ्या घडामोडी महाराष्ट्राने पाहिल्या आहेत.
पुढे बोलत असताना अजित पवार म्हणाले की, ज्यांच्या हाती सत्ता असते ते त्यांना हव्या त्या गोष्टी करत असतात. मात्र दसरा मेळाव्याबाबत वाद घालण्यापेक्षा आधी एकाने आणि त्यानंतर दुसऱ्याने कार्यक्रम घ्यायला हवा. मात्र या सभेनंतरच समजेल की, जनतेचा पाठींबा कुणाला आहे.