झुंजार लोकप्रतिनिधी गमावला, आमदार लक्ष्मण जगताप यांना अजित पवार यांची श्रध्दांजली
भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी झुंजार लोकप्रतिनिधी आणि जवळचा सहकारी गमावला, असं म्हणत शोक व्यक्त केला.
X
चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप (MLA Laxman Jagtap passes Away) यांच्या निधनाने जनतेच्या प्रश्नासाठी तळमळीने काम करणारा झुंजार लोकप्रतिनिधी, जवळचा सहकारी गमावला असल्याची भावना व्यक्त करत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit pawar) यांनी आमदार लक्ष्मण जगताप यांना श्रध्दांजली वाहिली.
अजित पवार म्हणाले, चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी तळमळीने काम केले. राजकीय, सामाजिक जीवनात त्यांनी केलेले काम कायम स्मरणात राहील. त्यांच्या निधनाने सर्वसामान्य जनतेचे प्रश्न विधीमंडळात मांडणारा धडाडीचा लोकप्रतिनिधी आपण गमावला. पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासात त्यांचे मोलाचे योगदान होते. सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी तडफेने काम करणाऱ्या लोकप्रतिनिधीची, सहकाऱ्याची उणीव कायमच जाणवेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात त्यांनी केलेले काम पिंपरी-चिंचवड परिसरातील जनता कधीही विसरु शकणार नाही, अशा शब्दात अजित पवार यांनी लक्ष्मण जगताप यांना श्रध्दांजली वाहिली.
पुणे शहरातील हा दुसरा धक्का- देवेंद्र फडणवीस
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष्मण जगताप यांना श्रध्दांजली अर्पण करताना पुणे जिल्ह्यातील हा दुसरा धक्का असल्याचे म्हटले आहे. तसेच पिंपरी चिंचवडच्या विकासाची दृष्टी असलेला आणि दांडगा जनसंपर्क असलेला नेता आमच्यातून निघून गेला. तसेच राज्यसभा आणि विधानपरिषदेच्या निवडणूकीसाठी अत्यवस्थ अवस्थेत असतानाही त्यांनी मतदान केले. त्यातून त्यांची पक्षनिष्ठा दिसून आली. पक्षावर निष्ठा असलेली व्यक्ती आम्ही गमावली आहे. त्यामुळे ही राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील क्षती आहे, असं मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.