अखेर मिलिंद नार्वेकर यांचं ट्वीट, शिंदे गटात प्रवेशावर पडदा पडणार?
चंपासिंग थापा यांच्यापाठोपाठ मिलिंद नार्वेकर हे सुध्दा शिंदे गटात सामील होतील, असं वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं होतं. त्यामुळे चर्चांना उधाण आले होते. मात्र मिलिंद नार्वेकर यांनी केलेल्या ट्वीटमुळे या चर्चांवर पडदा पडण्याची शक्यता आहे.
X
मिलिंद नार्वेकर हे गेल्या काही दिवसांपासून उध्दव ठाकरे यांच्यासोबत असल्याचे दिसले नाहीत. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणेशोत्सवाच्या काळात मिलिंद नार्वेकर यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली होती. यानंतर गेल्या काही दिवसांमध्ये मिलिंद नार्वेकर उध्दव ठाकरे यांच्यासोबत दिसले नाहीत. त्यातच शिंदे गटातील मंत्री गुलाबराव पाटील यांनी चंपासिंग थापा पाठोपाठ मिलिंद नार्वेकरही शिंदे गटात येतील, असं विधान केले होते. त्यामुळे मिलिंद नार्वेकर शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर अखेर मिलिंद नार्वेकर यांनी एक ट्वीट केले आहे.
मिलिंद नार्वेकर यांनी ट्वीट करून म्हटले आहे की, 5 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या शिवसेनेच्या पारंपरिक दसरा मेळाव्याची शिवतीर्थावर जय्यत तयारी सुरू आहे. त्या कामाची काल रात्री पाहणी केली. तसेच तेथे असलेल्या बंगाल क्लबच्या दुर्गोत्सवास भेट दिली आणि माँ दुर्गेचे दर्शन घेतले.
५ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या शिवसेनेच्या पारंपरिक दसरा मेळाव्याची शिवतीर्थावर जय्यत तयारी सुरू असून काल रात्री या कामाची पाहणी केली. तसेच येथे असलेल्या बंगाल क्लबच्या दुर्गोत्सवास भेट दिली व माँ दुर्गेचे दर्शन घेतले. pic.twitter.com/hzhh2YBMai
— Milind Narvekar (@NarvekarMilind_) October 3, 2022
या ट्वीटमध्ये मिलिंद नार्वेकर यांनी शिवसेनेचा पारंपरिक दसरा मेळाव्याच्या तयारीची शिवतीर्थ येथे जाऊन पाहणी केली, असं म्हटलं आहे. त्यामुळे अजूनही मिलिंद नार्वेकर शिवसेनेतच असल्याचे स्पष्ट होत आहे.