अनिल परब कपड्याची बॅग तयार ठेवा, किरीट सोमय्यांचा इशारा
X
ठाकरे सरकारचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यापाठोपाठ मंत्री नवाब मलिक यांच्यावर ED ने केलेल्या कारवाईनंतर ईडीने आपला मोर्चा ठाकरे सरकारच्या तिसऱ्या मंत्र्याकडे वळवला आहे. त्यामुळे हा ठाकरे सरकारला मोठा धक्का मानला जात आहे.
ठाकरे सरकारचे दोन मंत्री सध्या तुरूंगात आहेत. त्यापाठोपाठ आता शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर ईडीने छापेमारी केली आहे. त्यामुळे सध्या शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान अनिल परब यांनी बॅग तयार ठेवावी, असा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला आहे.
आज सकाळीच परिवहन मंत्री अनिल परब यांच्या सरकारी निवासस्थान, वांद्रे येथील खासगी निवासस्थानासह पुणे आणि रत्नागिरी येथील सात मालमत्तांवर ED ने छापेमारी केली आहे. त्यामुळे अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्यापाठोपाठ अनिल परब यांनीही बॅग भरावी, असा इशारा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिला आहे.
किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांचा दापोली येथील समुद्रकिणारी असलेला रिसॉर्ट तोडण्याची मागणी केली होती. त्यानंतर केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने राज्य सरकारला नोटीस पाठवत अनिल परब यांचे रिसॉर्ट तोडण्याचे आदेश दिले आहेत. मात्र तरीही या रिसॉर्टवर कारवाई झाली नाही. त्यामुळे किरीट सोमय्या यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांची भेट घेत अनिल परब यांचे रिसॉर्ट तोडण्याची मागणी केली. तर हे अनधिकृत रिसॉर्ट लवकरच तोडण्यात येईल, असे केंद्रीय मंत्र्यांनी किरीट सोमय्या यांना सांगितले.
तसेच किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांच्यावर घोटाळ्याचे गंभीर आरोप केले होते. तर गेल्या अनेक दिवसांपासून सोमय्या अनिल परब यांना इशारा देत होते. मात्र अखेर ईडीने छापेमारी केल्यानंतर अनिल परब यांनी कपड्याची बॅग तयार ठेवावी, असा इशारा दिला आहे.