Home > Politics > यामागे राज्य सरकारचा डाव, प्रज्ञा सातव यांच्यावरील हल्ल्यानंतर संजय राऊत यांची फडणवीस यांच्यावर टीका

यामागे राज्य सरकारचा डाव, प्रज्ञा सातव यांच्यावरील हल्ल्यानंतर संजय राऊत यांची फडणवीस यांच्यावर टीका

यामागे राज्य सरकारचा डाव,  प्रज्ञा सातव यांच्यावरील हल्ल्यानंतर संजय राऊत यांची फडणवीस यांच्यावर टीका
X

विधानपरिषदेच्या आमदार प्रज्ञा सातव यांच्यावरील हल्ल्यानंतर संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्र सोडले. दिवंगत काँग्रेस नेते राजीव सातव (Rajeev Satav) यांच्या पत्नी आमदार प्रज्ञा सातव (Pradnya Satav) यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. त्यातच संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीकास्र सोडले आहे.

यावेळी संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्रामध्ये कायदा व सुव्यवस्थेच्या बाबतीत अराजकता आणि अनागोंदी सुरु आहे. आमदार आणि लोकप्रतिनिधी सोडाच. पण सामान्य जनता, व्यापारी, महिला वर्ग, एका भीतीच्या छायेखाली आहे.

आधी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या गाडीवर दगड फेकला गेला. त्याबाबत पोलिस सारवा सारव करीत आहे. पण हा विषय कायदा सुव्यवस्थेच्या संदर्भात आहे. आदित्य ठाकरे यांच्यापाठोपाठ मराठवाड्यामध्ये विधानपरिषदेच्या आमदार प्रज्ञा सातव यांच्यावरही हल्ला झाला, असे प्रकार रोज घडत आहेत. त्यामुळे उपमुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी आपला आधीचा कार्यकाळ आठवावा आणि आताच्या कार्यकाळाशी तुलना करावी, असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केले.

सध्या सामान्य माणसापासून ते लोकप्रतिनिधींपर्यंत सर्वजण दहशतीमध्ये आहेत. विशेषतः विरोधकांची सुरक्षा व्यवस्था ज्या पध्दतीने काढून घेतली जात आहे. त्यावरून यामागे सरकारचा काही डाव आहे का? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. त्याबरोबरच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेळीच पाऊले उचलली नाहीत तर त्याचा फटका त्यांना बसू शकतो, असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केले.

Updated : 9 Feb 2023 12:27 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top