'आता खरा खेळ सुरू झाला आहे'; आशिष दुवा यांचा एकनाथ शिंदेंना इशारा
X
महाराष्ट्रात सध्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सरकार काम करत आहे. या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार सांभाळत आहेत. 4 महिन्यांपूर्वी ज्यावेळी या सरकारची स्थापना झाली त्यावेळी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली. त्यावेळी उपमुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.
त्यानंतरच यावरून अनेकांनी भारतीय जनता पक्ष आणि देवेंद्र फडणवीस यांना हिनवायला सुरुवात केली. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर भाजपने त्यांना साथ दिली त्यावेळी भाजपकडे संख्याबळ जास्त असल्याने देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदी विराजमान व्हावे अशी अनेकांची इच्छा होती. याच पार्शवभूमीवर आता भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक मोठं विधान केले आहे.
महाराष्ट्र भाजप अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, 'जोपर्यंत मी पक्षाचा प्रदेशाध्यक्ष आहे, तोपर्यंत राज्याच्या सर्वांगिण विकासासाठी देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हायला हवे. ही माझी वैयक्तिक इच्छा आहे.' त्यांच्या या विधानानंतर आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे आता विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी यावर प्रतिक्रिया देत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेले सरकार अस्थिर असल्याचा आरोप केला आहे. अशातच आता काँग्रेसचे सचिव आशिष दुवा यांनी याविषयात एक ट्विट शेअर करत आपले मत व्यक्त केले आहे.
खेळ सुरु आहे... @BJP4Maharashtra rings in countdown of @mieknathshinde led #EDsarkar in #Maharashtra... https://t.co/2plfKy01BA
— Ashish Dua (@ashishdua_INC) December 19, 2022
आशिष दुवा यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विधानाचा संदर्भ देत एक ट्विट शेअर केले आहे. ज्यात त्यांनी 'आता खरा खेळ सुरू झाला आहे' असे सूचक विधान केले आहे. याशिवाय दुवा यांनी 'आता खऱ्या अर्थाने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या सत्तेच्या खेळात भारतीय जनता पक्षाने उडी घेतली आहे.' असं म्हणत एकनाथ शिंदे यांना इशारा दिला आहे.
दरम्यान नुकताच विरोधी पक्षात असणाऱ्या महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या वतीने एकत्रित मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी 'सध्या महाराष्ट्रात असलेले शिंदे-फडणवीस सरकार फेब्रुवारी महिना बघू शकणार नाही.' असे विधान केले होते. त्यानंतर देखील विरोधकांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवरून सरकारला घेरायला सुरुवात केली होती. अशातच 19 डिसेंबर पासून सुरू झालेल्या महाराष्ट्र विधानसभा हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार खडाजंगी रंगल्याचे पहायला मिळाले. त्यामुळे आता अधिवेशनात पुढील उरलेल्या 9 दिवसात कोणकोणत्या मुद्द्यांवरून सरकारवर ताशेरे ओढले जाणार हे देखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे..