Home > Politics > एकनाथ शिंदे यांचे बंड हे शिवसेनेचे ऑपरेशन कमळ आहे का?

एकनाथ शिंदे यांचे बंड हे शिवसेनेचे ऑपरेशन कमळ आहे का?

एकनाथ शिंदे यांचे बंड हे शिवसेनेचे ऑपरेशन कमळ आहे का?
X

शिवसेनेचे (Shivsena )एकनिष्ठ मंत्री म्हणून प्रतिमा असलेल्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पक्षातील नाराज आमदारांना घेऊन बंड केले आहे. त्यामुळे भाजपच्या राजकारणाला उत्तर म्हणून निर्माण झालेले महाविकास आघाडी सरकार कोसळणार हे निश्चित झाले आहे. शिवसेनेचे आमदार एवढ्या मोठ्या प्रमाणात फोडण्यात एकनाथ शिंदे यांना एकट्याला यश आले का, अशी चर्चा सुरू झाली आहे, की यामागे उद्धव ठाकरे (Udhav Thackrey) यांचीच खेळी आहे, अशीही चर्चा सुरू झाली आहे.

एकनाथ शिंदे यांच्यासारख्या एकनिष्ठ शिवसैनिकाने थेट उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध बंड करण्याची शक्यता कमी आहे. एवढेच नाही तर ४० आमदार फुटून त्यांच्यासोबत जाण्याची शक्यता कमी आहे, असे मत काही तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात आमदार आपल्या मतदारसंघातील शिवसैनिकांची नाराजी स्वीकारुन बंड करण्याची शक्यता दिसत नाही, त्यांना पक्षश्रेष्ठींकडूनच आदेश असावेत अशीही चर्चा आहे.

अशी चर्चा होण्याचे आणखी एक कारण म्हणजे थेट देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यासोबत उद्धव ठाकरे यांनी सत्तेत सहभागी होणे ही माघार असेल. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी बंड करावे आणि पक्ष हितासाठी उद्धव ठाकरे यांनी भाजपला पाठिंबा द्यावा, असा मार्ग काढला जाण्याची शक्यताही वर्तवली जाते आहे.

शिवसेनेच्या नेत्यांविरुद्ध गेल्या काही दिवसात सुरू झालेल्या EDच्या कारवायांचा विचार केला तर उद्धव ठाकरे यांच्यावर देखील पक्षातील नेत्यांचा दबाव असण्याची शक्यता आहे. भाजपसोबत जाऊन केंद्रीय यंत्रणांचा ससेमिरा थांबवावा, अशी भूमिका प्रताप सरनाईक यांनी जाहीरपणे मांडली होती. त्यामुळे शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद, वाढीव मंत्रीपदे, केंद्रात एखादे मंत्रीपद आणि EDच्या चौकशीपासून सुटका तसेच मुंबई महापालिकेवर पुन्हा ताबा यासाठी उद्धव ठाकरे यांनीच एकनाथ शिंदे यांना आपले प्यादे म्हणून वापरल्याची चर्चा आहे.

Updated : 22 Jun 2022 2:32 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top