देगलूर विधानसभा पोटनिवडणूक, लढत चौरंगी होण्याची शक्यता
X
नांदेड : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या नांदेड जिल्ह्यातील देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीत चुरस वाढल्याचे चित्र दिसत आहे. भाजपा, काँग्रेस पाठोपाठ वंचित बहुजन आघाडी आणि जनता दल (सेक्युलर) या पक्षांनी आपापले उमेदवारी अर्ज दाखल केल्याने ही लढत आता चौरंगी होणार असे दिसते आहे. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण २३ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहे, तरीही चौरंगी लढत चुरशीची होणार असे दिसते.
देगलूर विधानसभेत भाजपाने माजी आमदार सुभाष साबणे यांना तर काँग्रेसने दिवंगत आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे चिरंजीव जितेश अंतापूरकर यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेस, भाजपा पाठोपाठ लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या मताधिक्याने आत्मविश्वास वाढलेल्या वंचित बहुजन आघाडीने वैद्यकीय क्षेत्रातील डॉ.उत्तम इंगोले तर जनता दल सेक्युलर कडून देगलूरचे माजी नगराध्यक्ष, पत्रकार विवेक केरुरकर यांना उमेदवारी दिल्याने या मतदारसंघातील लढतीची चुरस वाढली आहे.
येत्या १३ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने २३ पैकी किती उमेदवार या लढतीत टिकतील हे पाहणे महत्वाचे आहे. या लढतीकडे संबंध महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे. त्यामुळे काँग्रेस, भाजपने जिल्ह्यातील व राज्यभरातील डझनभराहून अधिक नेते या मतदारसंघात तळ ठोकून आहेत. काँग्रेसकडून व महाविकास आघाडीतील घटक पक्षातील नेत्यांकडून या निवडणुकीत अंतापूरकर यांना निवडुन आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत, त्याचबरोबर भाजपाने शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांना उमेदवारी दिल्याने शिवसेना पक्षातील अनेक कार्यकर्ते आपल्या पदाचे राजीनामे देत आहेत. त्यामुळे साबणे यांचे पारडे जड होताना दिसत आहे, उलटपक्षी शिवसेनेचे संपर्कप्रमुख आनंद जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हावार नेते या मतदारसंघात प्रचार सभा घेत असल्याने ही चुरस अधिक वाढताना दिसत आहे. तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार उत्तम इंगोले यांचा प्रचाराचा जोर वाढताना दिसतो आहे ,त्यासोबतच जनता दल सेक्युलरचे उमेदवार केरुरुकर हे माजी नगराध्यक्ष असल्यामुळे व अनेक वर्ष पत्रकारितेत असल्यामुळे केरुरकर यांनीही प्रचारात उडी घेतली आहे.