गर्भाशयाच्या कॅन्सरचे उपचार कसे करावे?
X
ढोबळमानाने गर्भाशयाचे बॉडी ( Body) व सर्विक्स ( Cervix) अशा दोन भागात विभाजन केले जाते. आजच्या लेखात आपण गर्भाशयाची बॉडी/ पिशवी चा कॅन्सर बद्दल माहिती घेवू. प्रगत देशामध्ये (अमेरिका/युरोप) गर्भाशय पिशवीच्या कॅन्सरचे प्रमाण अधिक जास्त आहे. भारतासारख्या देशाचा विचार केल्यास हे प्रमाण खूप कमी आहे म्हणजे साधारण २% आहे. परंतु मागील काही वर्षात ते प्रमाण दुपटीने वाढून ४ % झाले आहे.
साधारणपणे गर्भाशयाचा कॅन्सर साठी ओलांडलायानंतर उदभवणारा आजार असून ८० टक्के रोग स्त्रियामध्ये मासिक पाळी बंद झाल्यावर आढळतो.
गर्भाशयाचा कॅन्सर होण्याची कारणे काय आहेत ?
गर्भाशयातील पेशींची वाढ व कार्य ही estrogen व progestorone या हार्मोन वर अवलंबून असते. पेशींची वाढ मुख्यतः estrogen मुळे होते त्यामुळे शरीरात estrogen ची मात्रा जास्त झाल्यास पेशी वाढत जाऊन कॅन्सर मध्ये रूपांतर होते. त्यामुळेच मासिक पाळी लवकर सुरु होणे किंवा फार उशिरा बंद होणे, मुल नसणे तसेच बदलत्या राहणीमानामुळे जसे व्यायाम न करणे, मुल न होऊ देणे, लठ्ठपणा, डायबेटीस, ब्लड प्रेशर आणि estrogen चे उपचार घेणे इत्यादी मुळे गर्भाशयाच्या कॅन्सरचे प्रमाण वाढते. साधारणपणे ५ टक्के गर्भाशयाचा कॅन्सर हा अनुवंशिक आजारामुळे होऊ शकतो.
गर्भाशयाच्या कॅन्सरची लक्षणे व तपासणी:-
१. मासिक पाळीत सारखा रक्तस्त्राव होणे
२. पोटात दुखणे
३. पोट सुमारणे व पोटात पाणी होणे
४. श्वास घेण्यास त्रास होणे
५. पाठीत दुखणे
(मासिक पाळी बंद झाल्यानंतर रक्तस्त्राव होत असल्यास ताबडतोब स्त्रीरोग तज्ज्ञांना दाखवून तपासण्या करणे गरजेचे असते तसेच आपल्याला रक्तस्त्राव होतो म्हणून कॅन्सर झाला असे लगेच मानू नये. कारण रक्तस्त्रावाची बरीच कारणे असू शकतात. त्यातील गर्भाशयाचा कॅन्सर हे एक कारण असू शकते. त्यामुळे तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योग्य त्या तपासण्या करून घ्याव्यात.)
तपासणी:- रक्त तपासणी, छातीचा एक्स रे, व शक्य असल्यास एम. आर.आय करावा. खरोखरच कॅन्सर आहे कि नाही ते पाहण्यासाठी तुकडा काढून तपासणी करावी.
गर्भाशयाच्या कॅन्सरचे उपचार कसे करावे?
गर्भाशयाचा कॅन्सर साधारणपणे ८० टक्के स्त्रियांमध्ये पहिल्या किवा दुसऱ्या टप्प्यामध्ये माहिती पडतो त्यामुळे रोग पूर्ण पणे बरा होण्याचे प्रमाण ९० ते ९५ टक्के आहे. फक्त उपचार योग्य वेळी, योग्य ठिकाणीच आणि योग्य त्या तज्ज्ञ डॉक्टर कडे होणे गरजेचे असते.
शस्त्रक्रिया, रेडिओथेरपी, केमोथेरपी आणि हार्मोनल थेरपी या सर्व प्रकारच्या उपचार पध्दती गर्भाशयाचा कॅन्सर नीट करण्यासाठी वापरल्या जातात. शक्य असल्यास सर्व रुग्णांमध्ये शत्रक्रिया करून गर्भाशय, अंडाशय तसेच बाजूच्या पेशी काढणे गरजेचे असते. काढलेला रोग पॅथालॉजिस्टकडे पाठवणे गरजेचे असून त्या रिपोर्ट नुसार रुग्णाला पुढे इतर उपचारांची गरज आहे कि नाही ते ठरवले जाते.
रेडिओथेरपी बऱ्याच रुग्णांना देणे गरजेचे असते. रेडिओथेरपी देण्याच्या पध्दतीवरुण ई.बी.आर.टी व ब्राकीथेरेपी असे दोन प्रकार पडतात. रोग सुरुवातीच्या टप्पात असल्यास केवळ ब्राकीथेरेपी उपचार पुरेसे असून ई.बी.आर.टी रेडिओथेरपी शी संबंधित दुष्परिणाम टाळले जावू शकतात तसेच उपचाराचा कालावधी देखील कमी लागतो. दुसरा टप्पा आणि पुढील टप्प्यात ई.बी.आर.टी रेडिओथेरपीची गरज लागतेच. किमान ३डी- सी.आर.टी उपचार पध्दती अनुसरून रेडिओथेरपी शी संबंधित दुष्परिणाम कमीत कमी ठेवता येतात.
केमोथेरपीचे उपचार तिसऱ्या आणि पुढील टप्प्यात असणाऱ्या रूग्णांसाठी वापरले जातात. केमोथेरपीचे उपचार दर आठवड्याने किंवा दर तीन आठवड्याने दिले जातात. तसेच परत परत उद्भवणा-या रोगासाठी दुसऱ्या किंवा तिसऱ्या प्रकारच्या किमोथेरपी चे उपचार तसेच टार्गेट थेरपी उपयोगात आणली जाते. हार्मोनल थेरपी आजपर्यंत म्हणावी तशी उपयोगात आणली गेली नाही. परंतु आताशी तिचे महत्त्व लक्षात येत आहे.
डॉ. दिलीप निकम,
विभाग प्रमुख, कॅन्सर विभाग.
कामा व अल्ब्लेस हॉस्पिटल, मुंबई