फडणवीसांवरील 'टोल'च्या टीकेवर तेजस्विनी 'ट्रोल'
प्रसिद्ध अभिनेत्री तेजस्विनी पंडित हे नाव गेले काही दिवसापासून चर्चेचा विषय बनला आहे. ही चर्चा तिचा एखादा चित्रपट किंवा भूमिका यांविषयी नाही, तर तिने ‘टोल’ या विषयावर केलेल्या टीकेमुळे आहे.
X
प्रसिद्ध अभिनेत्री तेजस्विनी पंडित हे नाव गेले काही दिवसापासून चर्चेचा विषय बनला आहे. ही चर्चा तिचा एखादा चित्रपट किंवा भूमिका यांविषयी नाही, तर तिने ‘टोल’ या विषयावर केलेल्या टीकेमुळे आहे. तिने ‘एक्स’ पोस्ट करत समाजमाध्यमावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडिओ शेअर करून ‘आमच्या टोलचे पैसे गेले कुठे?’ असा सवाल उपस्थित केला होता. या प्रश्नाने राजकीय वर्तुळात वादाचा मुद्दा बनला आहे.
या व्हिडिओची पार्श्वभूमी होती, राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा उपस्थित केलेला महाराष्ट्रातील टोलचा मुद्दा. तेजस्विनीने हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर, काही काळाने तिच्या ‘एक्स’ हँडलची ‘ब्लू टिक’ गेली. त्यावर तेजस्विनीने पुन्हा एक पोस्ट लिहून ‘माझ्या काय किंवा सामान्य माणसाच्या मनातील आक्रोश कमी होणार नाही’ असे सांगितले.
यावरून आता वाद-प्रतिवाद, वेगवेगळे मीम्स, तेजस्विनीवर टीकेची झोड, ट्रोलिंग असे सर्व काही सुरू आहे. एखादा सामाजिक किंवा राजकीय प्रश्न निर्माण झाल्यानंतर कलाकारांनी त्यावर बोलावे, मत व्यक्त करावे असे अनेकदा म्हटले जाते; परंतु कलाकाराने व्यक्त व्हावे; फक्त आम्ही म्हणतो तसे किंवा आम्हाला जे वाटते तेच बोलावे, अशी काही तरी अपेक्षा असते. तेजस्विनी नेहमीच सडेतोड आणि थेट बोलणारी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. यापूर्वीही तिने समाजमाध्यमांवरून विविध विषयांवर मते व्यक्त केली आहेत. त्यामुळे तेजस्विनीच्या या पोस्टमुळे तीचे अनेकांनी कौतुक केलं तर काहीनी ट्रोलही केलं आहे.