Home > Entertainment > “सवाल ना पूछे वो पत्रकार अधुरा है”

“सवाल ना पूछे वो पत्रकार अधुरा है”

वादाच्या भोवऱ्यात अडकलेला “महाराज” सिनेमा तुम्ही पाहिला का? अनेकांनी हिंदू-मुस्लीम ॲंगलने दिलेल्या रिव्ह्यू पेक्षा “पत्रकारितेच्या नजरेतून” सुनील सांगळे यांनी केलेली समीक्षा वाचा…

“सवाल ना पूछे वो पत्रकार अधुरा है”
X

कालच नेटफ्लीक्सवर आलेला “महाराज” नावाचा नवीन चित्रपट पाहिला. “ सत्यार्थ प्रकाश” नावाचे पत्रिका काढणारे पत्रकार व समाजसुधारक करसनदास मुलजी यांच्या जीवनावर आधारीत हा चित्रपट आहे. करसनदास यांच्या आयुष्यातील घटनांवर “महाराज” हे पुस्तक सौरभ शहा यांनी लिहिले होते व त्या पुस्तकावर हा चित्रपट आधारित आहे.

वैष्णव संप्रदायाचा प्रमुख स्वामी असलेल्या आणि एखाद्या राजासारखा आलिशान हवेलीत राहणाऱ्या व आपल्या संप्रदायातील भक्तांवर पोलादी पकड असलेला हा जदूनाथ महाराज (उर्फ जेजे) नावाचा स्वामी स्वतःला कृष्णाचा अवतार म्हणवून घेतो व राजरोस महिलांचे शोषण करत असतो. लोकांची भक्ती या थराला गेलेली असते की ते चरणसेवा नावाखाली आपल्या नववधूला या स्वामींच्या हवेलीत उपभोगासाठी ठेवतात व त्याला जेजे चरणसेवा हे गोंडस नाव देतो. ही चरणसेवा देखील दुसरे भक्त पैसे देऊन खिडक्यातून पहातात. या भयानक शोषणाविरुद्ध करसनदास लढा उभारतात आणि परिणामी करसनदासांना त्यांच्या घरातून व समाजातून बहिष्कृत करण्यात येते व त्यांचा छापखानाही बेचिराख करण्यात येतो. तरीही या स्वामींच्या विरोधात सत्यार्थ प्रकाशमध्ये करसनादास लिखाण सुरू ठेवतात. शेवटी त्याविरोधात जेजे हे करसनदास विरोधात मानहानीचा दावा दाखल करतात. हा खटला तत्कालीन बॉम्बे सर्वोच्च न्यायालयात चालला व त्याचा निकाल १८६२ साली लागला.

धर्माच्या ठेकेदारांची भक्तांवर असलेली पोलादी पकड, भक्तांची महाराजांवर असलेली आंधळी भक्ती, त्यापायी आपली पत्नी, मुलगी, बहीण देखील महाराजांना अर्पण करणे इत्यादी गोष्टी या चित्रपटात दाखविलेल्या आहेत. चित्रपटातील संवाद उल्लेखनीय आहेत.

उदा.

“सोचनेवालो की दुनिया, दुनियावालो की सोच से अलग होती है।”… (करसनदास)

“सवाल ना पूछे वो भक्त अधुरा है,

और जवाब ना दे सके वह धर्म।”.. (करसनदास)

“वैसे तो जीवदया मे विश्वास रखते है हम;

पर महामारी का डर है तो चुहे मारना जरुरी हो जाता है।” (जेजे धमकी देतांना)

बरे अंधश्रद्धेपोटी महाराज, बापू आदी लोकांनी भक्तांचे आर्थिक आणि लैंगिक शोषण करणे या गोष्टी १८५० च्या जुन्या म्हणाव्या, तर अगदी आता आसाराम बापूने वेगळे काय केले आणि आधुनिक लोक त्याला कसे बळी पडले? धर्माच्या नावावर लोकांना मूर्ख बनविणे आणि मते मिळविणे तर आता जोरात सुरु आहेच. असे चित्रपट पाहून लोकांनी थोडी अंधभक्ती कमी केली तरी खूप होईल.

Updated : 29 Jun 2024 8:21 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top