गौतम अदानी यांना आणखी एक धक्का
हिंडेनबर्गने प्रसिध्द केलेल्या अहवालानंतर अदानी समूहाची घसरण सुरुच आहे. त्यापार्श्वभूमीवर गौतम अदानी यांना आणखी एक धक्का बसला आहे.
X
जागतिक भांडवली बाजारात नकारात्मक संकेतामुळे बुधवारी भारतीय शेअर बाजारामध्ये मोठी घसरण पहायला मिळाली. त्याचा थेट फटका अदानी समूहाला बसला आहे. अदानी समूहाचे एका दिवसात 51 हजार कोटी रुपये बुडाले आहेत. त्यामुळे अदानी समुहाचे मार्केट कॅप साडेसात लाख कोटी रुपयांपर्यंत खाली आले आहे. त्यामुळे गौतम अदानी (Gautam Adani) यांचे नाव जागतिक श्रीमंतांच्या यादीत (World Richest List) घसरले आहे. त्यामुळे गौतम अदानी हे फोर्ब्सच्या यादीनुसार सध्या 26 व्या स्थानावर फेकले गेले आहेत. यापुर्वी गौतम अदानी टॉप 10 मध्ये होते. (THE REAL-TIME BILLIONAIRES LIST)
हिंडेनबर्ग या संस्थेचा अहवाल येण्यापुर्वी अदानी समुहाचे मार्केट कॅप 19.19 लाख कोटी रुपये इतके होते. मात्र हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी समूहाच्या शेअरमध्ये मोठ्या प्रमाणावर घसरण झाली आहे. परिणामी 19.19 लाख कोटी रुपयांवरून अदानी समुहाचे मार्केट कॅप साडे सात लाख कोटींवर आले आहे. त्यामुळे हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी समुहाच्या मार्केट कॅपमध्ये साडे अकरा लाख कोटींची घसरण झाली आहे. एवढंच नाही तर अजूनही ही घसरण सुरुच आहे.
बुधवारी सेन्सेक्स (Sensex) 927 अंकांनी घसरुण 59 हजार 744 वर आला. तर निफ्टी (NIFTY) 272 अंकांच्या घसरणीसह 17 हजार 554 वर स्थिरावली. यामध्ये अदानी समुहाचे सर्व 10 समभाग घसरले. यामध्ये प्रमुख कंपनी असलेल्या अदानी एन्टरप्रायजेस या कंपनीचे शेअर्स घसरून 11.05 टक्के, अदानी पोर्ट्सचे 7.24 टक्के याबरोबरच अदानी पॉवर, अदानी ट्रान्समिशन, अदानी ग्रीन एनर्जी, अदानी टोटल गॅस, अदानी विल्मर, एनडीटीव्ही, एसीसी, अंबुजा सिमेंट या सर्व कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे 24 तासात अदानी समुहाचे 3.3 अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे.