देशात आर्थिक घसरणीची मुद्दा चर्चेत असताना आता बेरोजगारी वाढत असल्याचं आकडेवारीनुसार सिद्ध झालं आहे. सेंटर फॉर डेव्हलपमेंट स्टडिजचे विनोद अब्राहम यांच्या अभ्यासातून हे समोर आले आहे. या अभ्यासानुसार बांधकाम क्षेत्र, मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र आणि आयटी क्षेत्र या तीन क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे.
लेबर ब्युरोज एम्प्लॉयमेंट अनएम्प्लॉयमेंट सर्व्हेनुसार 2013-14 ते 2015-16 या कालावधीत देशातील एकूण रोजगारात दरवर्षी 0.4 टक्के इतकी घसरण सातत्याने होत असून या कालावधीतील एकूण बेरोजगारांची संख्या तब्बल 37.4 लाख इतकी वाढली आहे आणि ही बेरोजगारी दीर्घकालीन आहे. भारतात बांधकाम क्षेत्र रोजगार उपलब्ध करणारे सर्वात मोठे क्षेत्र आहे.
लेबर ब्युरोज एम्प्लॉयमेंट अनएम्प्लॉयमेंट सर्व्हेनुसार अलिकडच्या काळात असंघटित क्षेत्रात मोठी घसरण झाली आहे तर संघटित क्षेत्रात वाढीचा दर स्थिर राहिला आहे.
यासाठी अब्रागहम यांनी लेबर ब्युरोज एम्प्लॉयमेंट अनएम्प्लॉयमेंट सर्व्हेचा आणि विविध संस्थांच्या तिमाही रोजगार अहवालाचा आधार पुरावा म्हणून वापरताना पुरवठा आणि मागणीची बाजू यांचा वापर केला आहे. यापैकी आर्थिक तज्ञ मागणीची बाजू या संज्ञेचा वापर मालक असा वापरतात तर पुरवठा हा प्रयोग बेरोजगारांसाठी वापरला जातो.
सर्व्हेनुसार भारतात रोजगार निर्मितीचे चित्र फार दयनीय आहे. सन 2011 मधील ऑक्टोबरच्या तिमाही निकालानंतर कुठल्याही तिमाही निकालामध्ये रोजगार असणाऱ्यांची संख्या 2 लाखांहून अधिक कधीच राहिली नाही. कामगार मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार दरवर्षी सुमारे 12 दशलक्ष भारतीय कामगार वर्गात नव्याने येतात. मात्र सन 2013 ते 2016 या कालावधीत रोजगार निर्मितीत झालेल्या घसरणीमुळे परिस्थिती खुपच खालवली आहे. अहवालानुसार गेल्या तीन वर्षात रोजगार निर्मितीमधील घसरण सर्वात जास्त आहे.
मार्च 2010 ते मार्च 2012 या दोन वर्षांमध्ये काही ठरावीक क्षेत्रांमधील रोजगार निर्मिती 18.15 लाखांनी वाढती होती. याउलट सम 2012 ते 2014 या दोन वर्षात केवळ 6.20 लाख नवे रोजगार निर्माण झाले. त्यापुढील 19 महिन्यात हा आकडा आणखी खाली येत केवळ 5.92 लाख रोजगार निर्मिती झाली.
मार्च 2014 ते डिसेंबर 2015 या कालावधीत दर महिन्याला सरासरी रोजगार निर्मिती 30 हजारांपर्यंत खाली घसरली तर मार्च ते डिसेंबर 2015 दरम्यान अवघे 8 हजार नवे रोजगार उपलब्ध झाले. भारतात प्रथमच रोजगारात इतकी मोठी घसरण झाली असावी, असे मत अब्राहम यांनी मांडले आहे.
भारतात असंघटीत क्षेत्राबरोबरच संघटीत क्षेत्रातही रोजगाराची समस्या वाढत आहे. सर्वच क्षेत्रात हीच परिस्थिती दिसत आहे. याचा सर्वाधिक फटका अल्प उत्पन्न कामगारांना बसत आहे.