गजेंद्र चव्हाण यांच्या नियुक्तीमुळे वादात सापडलेल्या पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी अभिनेते अनुपम खेर यांची निवड करण्यात आली आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाकडून बुधवारी ही घोषणा करण्यात आली. गजेंद्र चौहान यांची २०१५ मध्ये एफटीआयआयचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. पण त्यांच्या विरोधात एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनी निदर्शने करत त्यांची हकालपट्टी करण्याची मागणी केली होती.
आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा दावा होता की, ‘एफटीआयआय’ने चित्रपटसृष्टीला अनेक मातब्बर कलाकार व तंत्रज्ञ दिले आहेत. या संस्थेचे अध्यक्षपद भूषवण्यास गजेंद्र चौहान हे अजिबात पात्र नाहीत' . विद्यार्थ्यांने आपली मागणी लावून धरण्यासाठी मोठे आंदोलन केले. पण तेव्हा सरकारने यावर कोणताही निर्णय घेतला नाही. ‘महाभारत’ या मालिकेत युधिष्ठिराची भूमिका गजेंद्र चौहान यांनी केली होती. या भूमिकेव्यतिरिक्त नावाजलेली अशी एकही भूमिका त्यांच्या नावावर नाही. त्यामुळे नियुक्तीपासूनच त्यांच्या नावाला प्रचंड विरोध होता. अखेर सरकारने त्यांना या पदावरून दुरू केले होते.
अनुपम खेर यांनी स्वतः गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीला विरोध दर्शविला होता. एफटीआयआयच्या अध्यक्षपदी जी व्यक्ती असेल ती सर्वार्थाने ते पद भूषवण्यासाठी योग्य असणे आवश्यक आहे. तिला जागतिक सिनेमाचे उत्तम ज्ञान असणे तसेच सध्याच्या सिनेमांमध्ये होणाऱ्या बदलांची माहिती असणे आवश्यक आहे. या संस्थेला चौहान यांच्यापेक्षा जास्त ताकदीच्या अध्यक्षाची गरज असल्याचे खेर यांनी म्हटले होते.
खेर यांच्या नियुक्तीबद्दल पत्नी किरण खेर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचे आभार मानले. विद्यार्थ्यांना आणि संस्थेला त्यांच्या नियुक्तीचा फायदा होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. पण कोणत्याही संस्थेचे अध्यक्षपद हे काटेरी मुकुटासारखे असते, असे म्हणत चौहान यांच्या बदलीला एवढा वेळ का लागला या प्रश्नाचे उत्तर देणे त्यांनी टाळले