शिवसेनेला इशारा, आता फक्त टायर फुटले, निवडणुकीत नशीब फुटणार - विखे पाटील
भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या राजवटीत घरात फुले-शाहू-आंबेडकरांची तसबीर लावणेही देशद्रोह ठरल्याचा ठपका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी ठेवला आहे.
काँग्रेस पक्षाच्या जनसंघर्ष यात्रेच्या निमित्ताने येथील संगीतसूर्य केशवराव भोसले सभागृहात आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. नक्षलवादाच्या नावाखाली विचारवंत आणि साहित्यिकांवर होत असलेल्या दडपशाहीच्या अनुषंगाने त्यांनी केंद्र व राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. हैद्राबाद येथील कवि वरावरा राव यांच्यावरील कारवाईचा संदर्भ देताना ते म्हणाले की, त्यांच्या मुलींच्या घराची झडती घेताना पुणे पोलिसांनी त्यांना हिंदू असताना घरी देवी-देवतांऐवजी फुले-आंबेडकरांच्या तसबीरी का लावता? असा संतापजनक सवाल केला. हे सरकार फुले-शाहू-आंबेडकरांची विचारधारा संपुष्टात आणण्याच्या प्रयत्नात आहे. परंतु, ही विचारधारा समाजात इतकी खोलवर रूजली आहे की, त्याला धक्का लावण्याचा प्रयत्न केला तर येथील जनता भारतीय जनता पक्ष व शिवसेनेचे हे सरकार समूळ उखडून फेकल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही विरोधी पक्षनेत्यांनी दिला.
कट्टरवादी संघटना आणि त्यांच्याबाबत सरकारच्या मवाळ धोरणाबाबतही राधाकृष्ण विखे पाटील यांनी चौफेर हल्ला चढवला. ते म्हणाले की,राज्यातील सर्वसामान्य मराठी कुटुंबातील तरूणांच्या हातात पिस्तुले,बॉम्ब पोहोचली आहेत. त्यातून विचारवंतांच्या हत्या होत असून, सरकार अद्याप गप्प कसे, अशा प्रश्नही त्यांनी विचारला. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा संशयीत मारेकरी सचिन अंदुरे औरंगाबादेत कपड्याच्या दुकानात नोकरी करतो. दुसरा आरोपी शरद कळसकर कोल्हापुरात लेथमशीनवर काम करतो. डॉ. दाभोलकरांच्या विचारधारेशी तसूभरही संबंध नसताना हे आरोपी थंड डोक्याने त्यांची हत्या करतात. याचाच अर्थ त्यांची डोकी कोणी तरी भडकावली असून, तो‘महागुरू’ कोण? असा प्रश्न विरोधी पक्षनेत्यांनी उपस्थित केला. यासंदर्भात सनातन संस्था व त्यांचे प्रमुख डॉ. जयंत आठवले यांची चौकशी का होत नाही?अशी विचारणाही त्यांनी केली.
कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावरही विखे पाटील यांनी खरमरीत टीका केली. ते राज्याचे केवळ महसूलमंत्री नसून, ‘मुहूर्तमंत्री’ देखील आहेत. मंत्रीमंडळ विस्तार केव्हा होणार,शेतकरी कर्जमाफी केव्हा जाहीर होणार, मराठा आरक्षणासंदर्भात प्रक्रिया केव्हा होणार, भाजप-शिवसेनेची युती तुटणार की राहणार, असे सारे मुहूर्त तेच जाहीर करत असतात. आता जनता या सरकारला केव्हा घऱी बसवणार,याचाही मुहूर्त चंद्रकांत पाटील यांनी जाहीर करून टाकावा, असा टोला विरोधी पक्षनेत्यांनी लगावला.
रस्त्यांवरील खड्ड्यांच्या अनुषंगानेही त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली. खड्डेमुक्त महाराष्ट्रासाठी ते दरवर्षी नव-नवीन मुहूर्त जाहीर करतात. पण खड्डे काही संपत नाहीत. पूर्वी लोक खड्डे चुकवून गाडी चालवायचे. आता रस्ता शोधून गाडी चालवावी लागते. भ्रष्टाचारामुळे अधिकाऱ्यांचे खिसे भरतात, मंत्र्यांची घरे भरतात, पण सर्वसामान्य लोकांची आयुष्ये उद्ध्वस्त होतात, असे ते म्हणाले.
चंद्रकांत पाटील फार साधे आहेत, असा मुंबईत समज आहे. पण ते साधे असतील तर सांगली महापालिका निवडणुकीत अफाट पैसा कुठून खर्च केला? ते ‘कौन बनेगा करोडपती’त गेले होते की त्यांना एखादी ‘लॉटरी’लागली? असा प्रश्नांचा भडीमार त्यांनी केला.
मुंबई-नाशिक प्रवासादरम्यान शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्या गाडीचे टायर फुटल्याच्या घटनेवरून त्यांनी शिवसेनेवर निशाना साधला. आदित्य ठाकरेंच्या ड्रायव्हरने गाडीवर नियंत्रण मिळवले, ते बरे झाले. पण उद्धव ठाकरेंचे शिवसेनेवरील नियंत्रण सुटले आहे, त्याचे काय? आदित्य ठाकरे यांच्या गाडीचा टायर फुटण्याची घटना म्हणजे शिवसेनेला नियतीने दिलेला एक इशारा आहे. आता फक्त गाडीचा टायर फुटला आहे. ते सत्तेतून तातडीने बाहेर पडले नाहीत तर पुढील निवडणुकीत त्यांचे नशीब फुटल्याशिवाय राहणार नाही, असे विखे पाटील म्हणाले.