शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सध्या अयोध्येच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी अयोध्येत बोलताना ठाकरे यांनी आता राममंदिराची तारीख सांगा! असं म्हणत भाजपला ठणकावलं आहे.
आठवण करुन देण्यासाठी आलोय
‘आजचा दिवस माझ्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. मी इथे श्रेयवादाच्या लढाईसाठी आलो नाही. तर झोपलेल्या कुंभकर्णाला जागं करण्यासाठी आलो आहे. तो कुंभकर्ण सहा महिने झोपायचा.. हे कुंभकर्ण चार वर्षांपासून झोपलेत! जे आश्वासन जनतेला, हिंदूंना दिलं होतं त्याची आठवण करून देण्यासाठी आलो आहे. दिलेलं वचन पूर्ण करणं हेच आमचं हिंदुत्व आहे’, असं त्यांनी ठणकावून सांगितलं.
‘आपण सर्व एकत्र येऊन मंदिर निर्माण करू. मला कोणतंही श्रेय नको. मला मंदिर पाहीजे, असा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला. मंदिर निर्माणासाठी आणखी किती काळ घालवणार. मंदिर वही बनाएंगे, मगर तारीख नही बताएंगे, हे किती दिवस चालणार’, असा खणखणीत सवाल करत ते म्हणाले की, ‘मला मंदिर निर्माणाची तारीख हवी आहे, ती तारीख घ्यायला मी आलो आहे’. असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजप वर निशाणा साधला
काय म्हणाले उद्धव ठाकरे? ठळक मुद्दे
- अनेक महिने वर्षे झाली पण राम मंदिराचा प्रश्न मार्गी लागला नाही.
- आता मला राम मंदिर बांधणी कधी होणार याची तारीख हवी
- अध्यादेश आणायचा असेल तर सरकारने तो आणावा.
- राम मंदिरासाठी कायदा आणत असाल तर तेही सांगावे.
- नोटांबदीचा निर्णय घेतला त्याप्रमाणे हा देखील निर्णय घ्यावा.
- तुम्ही विसरलेल्या वचनांची माहिती देण्यासाठी आज मी येथे आलोय.
- मंदिर बनविण्यासाठी हिंमत लागते. छाती कितीही मोठी असली त्यामध्ये मर्दासाऱखे हृदय असणे गरजेचे आहे.
- आता हिंदू गप बसणार नाही.
- 'हर हिंदू की एक पुकार पहले राम मंदिर फिर सरकार', असेही ते म्हणाले.दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या या दौऱ्यामुळे देशातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.