राजस्थान विधानसभा निवडणूकीत वसुंधरा राजे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाला पराभव स्वीकारावा लागला. राजस्थानच्या राजकारणातील एक प्रभावी व्यक्तीमत्व म्हणून वसुंधरा राजे यांचं नाव घेतलं जातं. त्या सतत कुठल्या ना कुठल्या वादामुळे चर्चेतही राहतात. जाणून घेऊया वसुंधरा राजे यांचा जीवनपरिचय.
वसुंधरा राजे यांचा जन्म महिला दिनाच्या दिवशी, म्हणजे 8 मार्च 1953 ला मुंबईत झाला. त्यांचं शिक्षण मुंबईच्या सोफिया कॉलेज फॉर विमेन मध्ये झालं. राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र हे विषय घेऊन त्यांनी पदवी शिक्षण पूर्ण केलं.
वसुंधरा राजे सिंधीया या ग्वाल्हेरच्या शिंदे घराण्याच्या वंशज. त्यांचे वडील स्वर्गीय जीवाजीराव सिंधीया, आई स्वर्गीय विजयाराजे सिंधीया, भाऊ स्वर्गीय माधवराव सिंधीया, बहिण स्वर्गीय पद्मा राजे, उषा राजे, यशोधरा राजे असा त्यांचा परिवार आहे. सिंधीया घराण्याचा भारतीय राजकारणाशी फार जवळचा संबंध आहे.
1984 मध्ये वसुंधरा राजे यांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकारिणी सदस्य या नात्याने राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर 1985 मध्ये त्या भाजपाच्या राजस्थान युवा मोर्चाच्या उपाध्यक्ष झाल्या आणि त्याच वर्षी धोलपूर विधानसभा मतदारसंघातून त्या आमदार ही झाल्या. 1989 च्या लोकसभा निवडणूकीत त्या विजयी झाल्या, 1998 मध्ये त्यांना केंद्रीय विदेश राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर त्या सतत संसदीय राजकारणात सक्रीय राहिल्या. 2003 च्या निवडणूकीत त्यांना मुख्यमंत्री पदाची जबाबदारी मिळाली. त्यानंतर 2013 मध्ये त्यांना पुन्हा मुख्यमंत्रीपद बहाल करण्यात आलं.
आपल्या राजकीय कारकीर्दीत वसुंधरा राजे सतत काही ना काही वादात राहिल्या. जसवंत सिंह यांच्याबरोबर उघड वाद, ललित मोदी यांना मदत केल्याचा आरोप, ललित मोदी यांच्यासोबत बोगस कंपनीच्या माध्यमातून घोटाळ्याचा आरोप, सरकारी जमीनीवरच्या महालावर कब्जा, विमान खरेदी अशा विविध वादांमध्ये त्या सतत चर्चेत राहिल्या.