काँग्रेसनं आमदारकी नाकारली, भाजपनं खासदार केलं

Update: 2019-05-25 12:57 GMT

नेत्यांनी मोठमोठ्या पदांवर जावं, त्यासाठी कार्यकर्ते जीवाचं रान करतात. तेच कार्यकर्ते जेव्हा छोट्या-छोट्या संधीसाठी नेत्यांना विनवण्या करतात. मात्र, त्यातील बहुतांश जणांच्या मागण्या मान्यच होतात असं नाही. अशावेळी नाराज झालेल्या कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचं मोठ आव्हान नेत्यांसमोर असतं. अशाच एका कार्यकर्त्यानं काँग्रेसकडे विधानसभेची उमेदवारी नेत्याकडे मागितली होती. मात्र, नेत्यानं प्रयत्न करूनही काँग्रेसनं उमेदवारी दिली नाही. त्यामुळं थेट भाजपमध्ये जाऊन त्याच नेत्याविरोधात लोकसभेची निवडणूक लढवून निवडून आलेल्या नवनिर्वाचित खासदाराचं नाव आहे कृष्णपाल यादव. आणि ज्या नेत्याचा त्यांनी पराभव केलाय त्यांचं नाव आहे ज्योतिरादित्य सिंधिया.

मध्यप्रदेशातील गुना लोकसभा मतदारसंघावर सिंधिया घराण्याचं गेल्या तीन पिढ्यांपासून वर्चस्व राहिलं होतं. त्याला पहिल्यांदाच या निवडणूकीत धक्का बसलाय. विशेष म्हणजे ज्योतिरादित्य सिंधिया यांना त्यांच्याच एका कार्यकर्त्यानं पराभूत केलंय तेही 1 लाख 24 हजार 750 मतांनी. कृष्णपाल यादव असं या नवनिर्वाचित खासदारांचं नाव आहे.

कोण आहेत कृष्णपाल यादव ?

चारवेळा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहिलेल्या रघुवीर सिंह यादव यांचे चिरंजीव असलेले कृष्णपाल हे व्यवसायानं डॉक्टर आहेत. 2004 मध्ये कृष्णपाल यांनी राजकारणात प्रवेश केला आणि जिल्हा परिषदेचे सदस्यही झाले. सामाजिक कार्यक्रमांतील सक्रीय सहभागातून कृष्णपाल यांनी ज्योतिरादित्य यांचं लक्ष वेधून घेतलं. कृष्णपाल हे ज्योतिरादित्य यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांपैकी एक बनले.

काँग्रेसनं आमदारकी नाकारली, भाजपनं खासदार केलं

गुना-शिवपुरी लोकसभा मतदारसंघातून ज्योतिरादित्य यांच्या पराभवाची अनेक कारणं सध्या पुढे येत आहेत. 2018 मध्ये विधानसभा निवडणुकीत कृष्णपाल हे अशोकनगर जिल्ह्यातल्या मुंगावली विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवण्यास उत्सुक होते. कृष्णपाल यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा ज्योतिरादित्य यांना सांगितल्यावर त्यांनीही कृष्णपाल यांना मुंगावली विधानसभा मतदारसंघातून प्रचाराला सुरूवातही करण्यास सांगितलं होतं. मात्र, ऐनवेळी कृष्णपाल यांचं तिकिट काँग्रेसनं कापलं. त्यामुळं नाराज झालेल्या कृष्णपाल यांना भाजपनं थेट गुना-शिवपुरी मतदारसंघातून थेट लोकसभेची उमेदवारी देत ज्योतिरादित्य यांच्याच विरोधात निवडूनही आणलं.

Similar News