काय आहे ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ योजना?


 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Update: 2020-09-13 08:38 GMT

कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात येत्या 15 सप्टेंबर पासून ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही जनजागृती मोहीम दोन टप्प्यात राबविण्यात येणार आहे. या जनजागृती मोहिमेला लोकप्रतिनिधी, सर्व महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायत, गावोगावच्या दक्षता समित्या, स्वयंसेवी संस्थांनी मोहिमेत सहभागी होऊन सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेशी संवाद साधताना केले.

या मोहिमेचा पहिला टप्पा १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबरपर्यंत आणि दुसरा टप्पा १२ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर असा असणार आहे. यामध्ये घरोघरी जाऊन आरोग्य विषयक चौकशी केली जाणार आहे. यात दोन कर्मचाऱ्यांचे / स्वयंसेवकांचे एक पथक असेल. हे पथक एका दिवसात ५० घरांना भेटी देईल. या पथकामध्ये एक शासकीय कर्मचारी, आशा वर्कर आणि दोन स्थानिक स्वयंसेवक असतील. सर्वांच्या सहभागाने ही एक राज्यव्यापी मोठी मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

ही मोहीम सार्वजनिक आरोग्य, नगरविकास विभाग, ग्रामविकास विभाग, महिला व बालकल्याण विभाग यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे आणि महानगरपालिका, नगरपालिकांमध्ये, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र याचे नियोजन करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

जनजागृती मोहीम

आरोग्य विषयक जनजागृती करण्यासाठी विद्यार्थी, पालक, सामान्य व्यक्ती आणि विविध सामाजीक संस्था यांना सहभागी करून घेण्यासाठी, निबंध स्पर्धा, संदेश स्पर्धा इत्यादी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिकेही दिली जाणार आहेत.

Full View

Similar News