कथा देशाच्या दोन मुलींची

Update: 2017-05-12 10:23 GMT

ही कथा आहे दोन भारतीय तरुणींची.... अशा दोन तरुणी ज्या अतिशय क्रूर लैंगिक अत्याचारांच्या बळी ठरल्या. डिसेंबर २०१२ मध्ये राजधानी दिल्लीच्या मध्यवर्ती भागात ज्योती सिंग या तेवीस वर्षीय तरुणीवर अत्यंत कृरपणे सामूहिक बलात्कार करुन, तिचा खून करण्यात आला. वैद्यकीय क्षेत्रात कारकिर्द करुन आपल्या कुटुंबाला गरिबीतून बाहेर काढण्याचं स्वप्न पहाणारी ज्योती ही एक हुशार मुलगी होती. तर २००२ ला गुजारातमध्ये उसळलेल्या जातीय दंगलीच्या वेळी, दाहोड जिल्ह्यातील आपल्या गावात हल्ला करणाऱ्या संपप्त जमावापासून वाचण्यासाठी पळ काढण्याच्या प्रयत्नात असलेल्या बिल्कीस बानोवर भयानकपणे सामूहिक बलात्कार करण्यात आला. ती केवळ १९ वर्षांची होती आणि पाच महिन्यांची गर्भवतीही....एवढेच नाही तर बिल्कीसच्या तीन वर्षांच्या मुलीची तिच्या डोळ्यादेखत हत्या करण्यात आली आणि त्याचबरोबर तिच्या कुटुंबातील आणखी तेरा जणांचीही हत्या करण्यात आली. ज्योती आणि बिल्कीस यांनी आपल्या समाजाची काळीकुट्ट बाजू समोर आणली आहे. आणि तरीही त्यांच्या कथा या एकमेकींपेक्षा अगदी वेगळ्या आहेत. या वेगळेपणामुळेच याबाबत गंभीरपणे आत्मपरिक्षण करणे गरजेचे आहे.

गेल्या आठवड्यात, ज्योती सिंगच्या मारेकऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. याचाच अर्थ गुन्हा घडल्यापासून साडेचार वर्षांच्या आत तिला न्याय मिळाला. याच्या अगदी एकच दिवस आधी, मुंबई उच्च न्यायालयानं बिल्कीस खटल्यातील ११ आरोपींची जन्मठेपेची शिक्षा कायम केली, शिवाय हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सहा पोलीस अधिकारी आणि सरकारी डॉक्टरना तीन वर्षांच्या कारावासाची सजा सुनावली. ज्यावेळी ज्योती सिंगचा निकाल हा ‘टॉप हेडलाईन’ ठरत होता आणि सगळ्या वृत्तवाहीन्यांवर याला चोवीस तास प्रसिद्धी मिळत होती, बिल्कीसबाबतचा निकाल मात्र एवढी ठळक प्रसिद्धी मिळवू शकला नाही किंवा प्राईम टाईम चर्चांमध्ये फारसे स्थानही मिळवू शकला नाही.

हा फरक आश्चर्यकारक मुळीच नाही. ज्योतीचा दुःखद मृत्यू हा देशाच्या राजधानीतच झाला. बहुतेक वृत्तवाहीन्या आणि वृत्तपत्रांची मुख्यालये असलेल्या आणि कायदे करणारे लोकच जिथं बसतात अशा संसदेपासून अवघ्या काही किलोमीटीर अंतरावर ही भयानक घटना घडली. तिच्या मृत्यूनंतर अवघ्या काही तासांत हजारो लोक राजपथावर एकत्रित झाले आणि त्याचबरोबर हा निषेध आणखी तीव्र करण्यासाठी त्यांना माध्यमांची सातत्यपूर्ण साथही मिळाली. या रागाचे पडसाद संसदेत उमटले, संपूर्ण देशभरात तिच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त झाला, राजकीय नेत्यांनी तिच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि अखेरीस लैंगिक हिंसाचाराच्या या गंभीर समस्येबाबत एक उच्च स्तरीय समिती स्थापन करण्यात आली.

याउलट, बिल्कीस बानो मात्र दाहोडमधील दंगलग्रस्तांसाठीच्या निर्वासित छावण्यांमध्ये खितपत पडली होती. अहमदाबादपासून २०० किलोमीटर अंतरावर दक्षिण गुजरातमधील दाहोड हा आदिवासी बहुल जिल्हा आहे. बिल्कीसने स्थानिक पोलिसांकडे आपली तक्रार नोंदविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पोलिसांनी तिच्या या तक्रारीकडे दुर्लक्षच केले आणि वर तक्रार मागे घेण्यासाठी तिलाच धमकावलेही. अशा वेळी केवळ निष्ठावान स्वयंसेवी संस्था, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग आणि खंबीर कायदेशीर सल्लागारांच्या मदतीमुळेच तिला ही लढाई लढण्याचे बळ मिळाले. त्यातूनच हा तपास सीबीआयकडे सोपविण्याचा आणि हे प्रकरण गुजरातबाहेर हलविण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाकडून मिळविण्यात तिला यश आले. एक दशकाहून अधिक काळ बिल्कीसने मोठ्या धैर्याने हा खटला लढवला. या दरम्यान तिला सातत्याने घर बदलावे लागत होते आणि अजूनही मोकाट असलेल्या हल्लेखोरांच्या भितीने ती तिच्या गावातही परत जाऊ शकत नव्हती.

ज्योती सिंगचा खटला हा महिला हक्कांचा केंद्रबिंदू बनत गेला. पण, बिल्कीसचा खटला मात्र हळूहळू गुजरात दंगलीमधील फक्त आणखी एक खटलाच बनून राहीला. बिल्कीसला पाठिंबा देणाऱ्यांना किंवा तिच्यासाठी लढणाऱ्यांना ‘सुडो सेक्युलर किंवा झोळीवाले’ म्हणूनच हिणवण्यात आलं आणि गुजरात सरकारला बदनाम करण्यासाठीच ते हे उद्योग करत असल्याचा आरोपही त्यांच्यावर झाला. तर ज्यांनी ज्योतीचे प्रकरण हाती घेतले, त्यांच्याकडे मात्र बलात्कार कायद्याची पुनर्रचना करण्यासाठी लढणारे बिनिचे शिलेदार म्हणून पाहिले गेले. ज्योती सिंगने दाखविलेल्या धैर्याची आठवण म्हणून तिच्यावर जागतिक स्तरावर माहितीपट काढण्यात आले, मात्र बिल्कीस किंवा तिच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी क्वचितच कोणी उत्सुक होते.

जरी या दोन्ही खटल्यांतील आरोपींना शिक्षा झाली असली, तरी यामधील न्यायाधीशांच्या अंतिम निकालपत्रांतून लोकांच्या मनस्थितील विरोधाभास प्रतिबिंबित होतो. दिल्ली सामुहिक बलात्काराचे ‘पाशवी’ किंवा ‘राक्षसी’ असे वर्णन करताना, न्यायाधीशांनी या गुन्ह्याकडे ‘मानवताविरोधी गुन्हा’ या दृष्टीने पाहिले आणि हा एक ‘दुर्मिळातील दुर्मिळ’ खटला असल्याचे सांगत, त्यामुळेच त्यासाठी मृत्यूदंडच योग्य असल्याचा निर्वाळा दिला. बिल्कीसच्या खटल्यात न्यायाधीशांनी यामागे कटकारस्थान असल्याचा आरोप फेटाळून लावताना, हा गुन्हा क्षणिक भावनांच्या भरातून झाल्याचे म्हटले, पण त्याच वेळी आरोपी हे मुसलमानांना वेचून मारण्याच्या प्रयत्नात असल्याचेही मान्य केले. यावेळी बलात्काऱ्यांसाठी फाशीच्या शिक्षेची मागणी फेटाळून लावताना, न्यायाधीशांनी म्हटले, गोध्रा हत्याकांडानंतर हे “आरोपी सूडाच्या भावनेने पेटलेले होते.”

महत्वाचे म्हणजे, जेंव्हा मी बिल्कीसला ती या निकालाने समाधानी आहे का, असे विचारले, तिने अतिशय शांतपणे सांगितले, “ मला बदला कधीच नको होता, फक्त न्याय हवा होता!” यावर माझा एकूणच जगाला एक साधा प्रश्न आहेः जातीय दंगलीत सामूहिक बलात्काराच्या बळीला मिळणारा न्याय हा दिल्लीतील बसमधील सामूहीक बलात्काराच्या बळीला मिळणाऱ्या न्यायापेक्षा वेगळा आहे का?

ता.कः बिल्कीस आता ३४ वर्षांची आहे. तिच्यावर बलात्कार झाला त्यावेळी तिच्या पोटात असलेले बाळ आज पंधरा वर्षांचे आहे. 'त्याला वकील बनायचे आहे,' ती मला हसून सांगते. कदाचित तोच एके दिवशी ‘नविन भारताला’ न्यायाचा खरा अर्थ सांगू शकेल.

राजदीप सरदेसाई

अनुवाद - सुप्रिया पटवर्धन

 

Similar News