अझहर मसूदला ताब्यात द्या, राजदीप सरदेसाईंचं इम्रान खानला खुलं पत्र

Update: 2019-02-17 16:25 GMT

हे पत्र लिहित असताना मी अतिशय दु:खी आहे, मनात संतापही आहे. हो, इतर सगळ्या भारतीयांप्रमाणेच, पुलवामामध्ये जे झालं त्याचा राग माझ्या मनात आहे. 40 जवानांना शहीद व्हावं लागलं याच्या जखमांमुळे संपूर्ण देश व्यथित आहे आणि यामुळेच सगळीकडून बदल्याची मागणी होत आहे. ज्याने हल्ला केला तो सुसाइड बॉम्बर कश्मिरी असला तरी त्याच्या मागे निश्चितच पाकिस्तान आहे. याबद्दल काहीच शंका नाहीय. पाकिस्तान मध्ये असलेल्या जैशच्या हेडक्वार्टरमध्ये या हल्ल्याचं इंजिन रूम आहे. त्याला दिशा, सूचना, शस्त्र-स्फोटकं, ट्रेनिंग हे सर्वच त्याला तिथून मिळालंय. जैश आणि पाकिस्तानी सैन्य यांच्यातले संबंध सर्वांनाच माहित आहेत. तुमच्या बिजींग मध्ये बसलेल्या मित्राला वगळलं तर आंतरराष्ट्रीय समुदायानेही ते मान्य केलेले आहेत.

तुमचं सरकार देतं त्याप्रमाणे सर्वच दोष पाकिस्तानी सैन्याला देता येणार नाही. पाकिस्तान सरकार हे तुमचं सरकार आहे. तुम्ही या सरकारचे लोकनियुक्त प्रतिनिधी या नात्याने पंतप्रधान आहात. गेल्या 70 वर्षांत होतंय त्याप्रमाणेच सैन्य आणि जनरल बज्वा हेच सर्व करतायत, हे आम्हाल माहित आहे, पण तरीही तुम्ही तुमच्या जबाबदारीपासून दूर पळू शकत नाही. कर्तारपूर कॉरीडोअरच्या माध्यमातून भारतासोबत मैत्रीचे संबंध प्रस्थापित करण्याचं श्रेय जर तुम्ही घेत असाल तर प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या आसपास होत असलेल्या दहशतवादी कारवाया थांबवू न शकल्याचं अपयशासाठीही तुम्हालाच जबाबदार धरलं गेलं पाहिजे.

आणि इथेच मी दु:खी झालोय..

एक क्रिकेटर, नेता, परोपकारी माणूस अशा विविध भूमिकांबद्दल मी नेहमीच तुमचा चाहता राहिलोय. क्रिकेटर म्हणून तुम्ही खरंच अष्टपैलू कामगिरी पार पाडलीय. एका नाठाळ पण टॅलेंटेंड खेळाडूंच्या ग्रुपला प्रोत्साहन देऊन त्यांना एका आक्रमक टीम मध्ये रूपांतरीत करायचं काम तुम्ही केलं. सततच्या दुखापतींमधून वारंवार केलेलं कमबॅक, सहा सिक्सर, फास्ट बोलींगचं तंत्र, तुमची शरीरयष्टी आणि दिसणं या सगळ्याच गोष्टींचा आम्हाला सतत हेवा वाटत आलाय. तुम्ही 1992 मध्ये वर्ल्ड कप जिंकला तेव्हा मेलबोर्न मध्ये तुम्हाला चिअरअप करायला मी उपस्थित होतो.

भारतीय उपखंडातील क्रिकेट फॅन्सच्या एका अख्ख्या पिढीला तुमच्या करिष्माई क्रिकेटचं वेड होतं. क्रिकेट सोडून जेव्हा तुम्ही कँसर हॉस्पिटल सुरू करण्यासाठी आपलं जीवन वाहून घ्यायचं ठरवलं तेव्हा तर मी आणखीनच प्रभावित झालो होतो. आपल्या लोकप्रियता आणि स्थानाचा वापर समाजासाठी करण्यात संपूर्ण भागातील कुठल्याही क्रिकेटर पेक्षा आपण फार पुढे निघून गेलात. एका ‘नया पाकिस्तान’ च्या जडणघडणीसाठी तुम्ही खरंच मोठं योगदान दिलंय.

1990 च्या शेवटाला जेव्हा तुम्ही राजकारणात प्रवेश करायचा निर्णय घेतला तेव्हा सुरुवातीला मला ते अजिबात पटलं नव्हतं, मात्र, भ्रष्टाचार विरोधातील तुमची मोहीम आणि सातत्य यामुळे मला माझी भूमिका बदलणं भाग पडलं. राजकारणात आल्यानंतर इम्रान खान यांनी जहाल इस्लामी शक्तींसोबत समझौता केलाय असं अनेक टीकाकार बोलायचे, मात्र माझा त्यावर विश्वास नव्हता. दिल्लीतल्या एका कार्यक्रमात जेव्हा प्रेक्षकांमधून कुणीतरी तुम्हाला ‘तालिबान खान’ म्हटलं होतं, त्यावेळचा तुमचा संताप मला आजही आठवतो. अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेने केलेल्या ड्रोन हल्ल्याबाबतची तुमची भूमिका स्वच्छ होती. अशा अनैतिक हल्ल्यांमुळे शांतता प्रस्थापित होऊ शकत नाही. या तुमच्या म्हणण्यामागची स्पष्ट आणि प्रामाणिक भूमिका मला आठवतेय. राजकारणात सगळ्या प्रकारच्या तडजोडी कराव्या लागतात हे मला माहितीय, तरी मी तुम्हाला शंकेचा फायदा देऊ इच्छितो.

गेल्या वर्षी तुम्ही पंतप्रधान झालात तेव्हा मला खरंच बरं वाटलं. जगाच्या इतिहासातले तुम्ही पहिले टेस्ट क्रिकेटर आहात जो कुठल्यातरी देशाचं नेतृत्व करतोय, हा खरंच ऐतिहासिक क्षण होता. या निवडणूकीत सैन्याने हस्तक्षेप केला होता आणि आर्मीच्या पसंतीचे उमेदवार म्हणून तुम्ही निवडून आलात. या बातम्यांमुळे मला धक्का बसला होता, तरी मला खात्री आहे की तुमच्यावर कुणाचा रिमोट कंट्रोल चालू शकत नाही. तुमचं व्यक्तिमत्व पाहता तुम्हाला फार काळ कुणी प्रभावाखाली ठेवू शकत नाही.

भारत-पाक संबंधातल्या तणावाबाबत मी अजूनही आशादायी आहे. कुठलाही पाकिस्तानी पंतप्रधान तुमच्या इतकं भारत फिरलेला नाही, आणि कुणाचेच तुमच्या इतके भारतातील विविध स्तरांवर मित्र नसावेत, त्याचमुळे मला आशा आहे की तुमच्या काळात भारत-पाकिस्तानमधल्या दशकानुदशकांच्या अविश्वासाच्या वातावरणाला खीळ बसेल आणि एक नवी सुरूवात होऊ शकेल. आणि म्हणूनच कर्तारपूर योजनेची गोष्ट पुढे सरकली तेव्हा मला वाटलं की, तुम्हाला पाकिस्तानी आर्मीकडून पुरेशी सूट मिळालेली आहे. भारतातील माध्यमांच्या शिष्टमंडळासोबत मी मुद्दाम कर्तारपूरला आलो, कारण मला या नव्या इतिहासाचं साक्षीदार बनायचं होतं. दोन्ही देशांनी जुन्या गोष्टी बाजूला ठेऊन नवीन सुरूवात करण्याबाबत तुमचं भाषण खरोखरच तार छेडणारं होतं. पत्रकार परिषदेतही तुम्ही एक भारतीय तरूण पाकिस्तानी कैदेत असल्याच्या प्रकरणात जाणीवपूर्वक लक्ष घालण्याचं वचन दिलं. तेव्हा मला खरंच खूप समाधान वाटलं. तुमची सर्व पावलं योग्य दिशेने पडत होती, जे योग्य ते तुम्ही बोलत होता, जे योग्य ते करत होता. हा खरा इम्रान खान ज्याला मी ओळखत होतो, आदर करत होतो, ज्याला सींमांच्या पलिकडे जाऊन एक इतिहास रचायचा होता.

... आणि पुलवामा घडलं. अचानक तुम्ही गप्प झालात. मौन घेतलं, निषेधाचा साधा सूरही तुम्ही काढला नाहीत. पुलवामा साठी जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्यासाठी तुम्ही काहीच पावलं उचलली नाहीत, जसं काही अझहर मसूद तुमच्या ताब्याच्या बाहेरच होता. क्रिकेटमध्ये कधीच माघार न घेतलेल्या तुमच्या सारख्या माणसाने तुमचं सरकार नियंत्रित करणाऱ्या सैन्यासमोर गुडघे टेकले. तुम्ही जर अझहर वर कारवाई करू शकत नाही तर तुम्ही तसं सांगायला हवं. काश्मीर विवादीत मुद्दा आहे, दहशतवाद हा स्थानिक मुद्दा आहे आणि जैश म्हणजे स्वातंत्र्य सैनिक आहेत. ही पोपटपंची तुम्ही नाही चालवू शकत. तुम्ही जर अतिरेकी कारवाया घडवून आणणाऱ्यांवर कारवाई केली नाही तर आमच्या सारख्या असंख्य भारतीयांची मैत्री आणि अतिथ्य ज्याचा तुम्ही उपभोग घेतलाय तो तुम्हाला गमवावा लागणार आहे. माफ करा इम्रान भाई, क्रिकेटर म्हणून तुम्ही क्रिकेट बदलवणाऱ्या आणि बिघडवणाऱ्या गोष्टींसाठी तुम्ही न्यूट्रल अंपायरसाठी जोरदार पणे भांडला होतात. आज परत तसाच वॉक द टॉक करायची गरज आहे. राजकारणी म्हणून आता तुम्ही समाज उद्ध्वस्त करणाऱ्या अतिरेक्यांच्या विरोधात बोललं आणि कारवाई केली पाहिजे. अझहर मसूद ला तुम्ही भारताच्या ताब्यात द्या, सीमेवरील अतिरेकी छावण्या बंद करा, भारतासोबतचं हे 1000 वर्षाचं युद्ध संपवायचे आदेश सैन्याला द्या.. मला माहितीय हे करणं म्हणजे तुमची पंतप्रधानपदाची सद्दी संपवण्यासारखं आहे, तरी शेवटी तुमची चॉइस आहे. पद पणाला लावून अधिक शक्तीशाली व्हायचं की या देशातील तुमच्याबद्दल असलेलं सौहार्द पणाला लावायचं..निर्णय तुमचा आहे. जसं मी सुरूवातीलाच म्हटलं की मी हे पत्र अतिशय दु:खात आणि संतापात लिहितोय, कालांतराने संताप कमी होऊ शकतो. मात्र दु:ख मात्र कायम राहिल

सदिच्छा,

राजदीप सरदेसाई

[button data-color="" data-size="" type="square" target="" link=""]ता.क. या आठवड्यात क्रिकेट क्लब ऑफ इंडीयाच्या गॅलरीतील तुमचा फोटो काढण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. या फोटोला काळं फासायची धमकी शिवसेनेनं दिली आहे. क्रिकेटचा दिवाणा म्हणून मी थोडा खट्टू झालोय. खेळ राजकारणापासून दूर ठेवलं पाहिजे अशी माझी नेहमीच भूमिका राहिलीय. पण असं वाटणाऱ्या अल्पसंख्यांक लोकांपैकी मी एक आहे, चहूबाजूंनी फोटो काढण्याची संतप्त मागणी होत आहे. एक क्रिकेटर म्हणून तुम्हाला निश्चितच मानाचं स्थान मिळायला पाहिजे, पण भारताला रक्तबंबाळ करणाऱ्या पाकिस्तानचा नेता म्हणून तुम्ही त्यासाठी अजिबात पात्र नाही.[/button]

Similar News