कॉग्रेसवर घराणेशाहीचा नेहमीच आरोप होतो. कॉंग्रेस नेहमी काही घराण्यांना सोबत घेऊन राजकारण करते. सर्वसामान्यांना संधी देत नाही. अशी चर्चा नेहमीच माध्यमांमध्ये सुरु असते. विधानसभेच्या निमित्ताने कॉग्रेसने ही परंपरा कायम ठेवली होती. कॉंग्रेसने पक्षाचे राष्ट्रीय सचिव व लातूर शहराचे आमदार अमित देशमुख यांच्यासह लातूर ग्रामीण मतदारसंघातून त्यांचे बंधू धीरज देशमुख यांना उमेदवारी दिली होती.
विशेष म्हणजे विद्यमान आमदार त्र्यंबक भिसे यांचा पत्ता कट करत कॉंग्रेसने धीरज देशमुख यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे कॉंग्रेसने माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या दोनही मुलांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे त्यांच्यावर टीकाही झाली.
मात्र, या सर्व टीकांचा विचार न करता जनतेने दोनही देशमुख बंधूना मोठ्या मताधिक्यानं निवडून दिलं आहे. लातूर ग्रामीण मतदारसंघातून धीरज देशमुख, लातूर शहरातून आमदार अमित देशमुख निवडून आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या विधानसभेत आता दोनही देशमुख बंधू पोहोचणार आहेत.