टीआरपी घोटाळा गंभीर; अर्णब- पार्थोची समोरासमोर चौकशी करा : मुंबई सत्र न्यायालय
टीआरपी घोटाळा हा हेराफेरीचा साधा गुन्हा दिसत नसून आरोपी अर्णब गोस्वामी आणि पार्थो दासगुप्ताचे सांकेतिक संभाषण पाहता हे प्रकरण गंभीर आहे, त्यामुळे दोन्ही आरोपींची समोरासमोर चौकशी करण्याचे आदेश मुंबई सत्र न्यायालयाने मुंबई पोलिसांना दिले आहेत. मुंबई पोलिसांनी टीआरपी घोटाळा उघडकीस आणल्यानंतर मोठ्या प्रमाणात अटकसत्र करण्यात आलं होतं. रिपब्लिक टिव्हीचा संपादक अर्णब गोस्वामी आणि बार्कची माजी सीईओ पार्थो दासगुप्ता संशयाच्या भोवऱ्यात आहेत.
'न्यायालयासमोर जे कागदोपत्री पुरावे आले आहेत, त्यावरून हा केवळ 'टीआरपी' हेराफेरीचा साधा गुन्हा नाही, तर त्याहून अधिक गंभीर काही आहे. त्यामुळे या प्रकरणाचा सखोल तपास होणे अत्यावश्यक आहे. आरोपी पार्थो दासगुप्ता आणि वाहिन्यांचे मालक, अँकर यांच्यामधील व्हॉट्सअॅप संभाषणांत अनेक सांकेतिक शब्दही वापरण्यात आले आहेत. त्याचा अर्थ केवळ आरोपीच सांगू शकतो. त्यामुळे त्याची समोरासमोर चौकशी होणे आवश्यक आहे,' असे सत्र न्यायालयाने दासगुप्ताचा जामीन अर्ज फेटाळणाऱ्या आदेशात म्हटले आहे.
टीआरपी घोटाळ्याचा सूत्रधार असल्याच्या आरोपाखाली २४ डिसेंबर २०२०पासून अटकेत असलेला 'बार्क'चा माजी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पार्थो दासगुप्ताचा जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. ए. भोसले यांनी २० जानेवारीला फेटाळून लावला होता. तपासादरम्यान हाती लागलेल्या मोठ्या प्रमाणातील व्हॉट्सअॅप संभाषणांतून अनेक बाबी समोर येत असल्याने तपास अधिकाऱ्याला सखोल चौकशी करण्याची संधी मिळणे आवश्यक आहे, असे निरीक्षण न्यायाधीशांनी त्यात नोंदवले आहे.
'आरोपीचा जामीन अर्ज प्रलंबित असतानाच त्याच्या लॅपटॉप व मोबाइलच्या माध्यमातून तपास अधिकाऱ्याला मोठ्या प्रमाणात व्हॉट्सअॅप संभाषण हाती लागले. त्याअनुषंगाने न्यायदंडाधिकारी न्यायालयात पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आले. या संभाषणांचे मूल्य पुरावा म्हणून किती याची तपासणी खटल्याच्या सुनावणीच्या वेळी होईल. मात्र, हे सर्व संभाषण नंतर हाती लागल्याने तपास अधिकाऱ्याचा तपास स्वाभाविकपणे नव्याने सुरू होतो. आरोपी व वाहिन्यांच्या मालकांमधील या संभाषणात टीआरपीविषयी चर्चा दिसते. त्याबाबतची अधिक माहिती आरोपीच देऊ शकतो,' असे न्यायाधीशांनी आदेशात म्हटले आहे.