आंबे तोडले म्हणून मागासवर्गीय मुलाला मारहाण करून, अंगावर केली लघवी, मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल....

Update: 2021-06-08 13:05 GMT

पुरोगामी महाराष्ट्राला शरमेने मान खाली घालायला लावणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील अंजनविहिरे गावात 3 दिवसांपूर्वी ही घटना घडली आहे. आंब्याच्या कैऱ्या तोडल्या म्हणून शेतमालकासह सालदाराने मागासवर्गीय समाजातील एका अल्पवयीन मुलाला 2 तास झाडाला बांधून ठेवले.

त्याचा मोबाईलमध्ये व्हिडिओ काढून तो व्हाट्सअपवर व्हायरल पण केला. धक्कादायक म्हणजे, शेतमालकाने त्या मुलाच्या अंगावर लघवी केल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे. या प्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात शेतमालकासह सालदारावर गुन्हा दाखल झाला असून, दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

गोपी उर्फ विवेक रवींद्र पाटील तसंच प्रवीण पावऱ्या अशी या घटनेतील संशयित आरोपींची नावे आहेत. दोघे अंजनविहिरे येथील रहिवासी आहेत. विवेक पाटील हा शेतमालक आहे तर प्रवीण पावरा आदिवासी समाजाचा असून सालदारकी करतो.

नेमकी काय आहे घटना?

पीडित अल्पवयीन मुलगा हा मागास वर्गीय समाजातील आहे. त्याचे कुटुंबीय उल्हासनगर येथे राहते. 12 वीच्या शिक्षणासाठी तो अंजनविहिरे येथे मामांकडे आलेला होता. 5 जून रोजी तो त्याच्या आजीची औषधी घेऊन गिरड गावातून घरी परत जात होता. रस्त्यात त्याने गोपी पाटील याच्या शेतातील आंब्याच्या झाडाच्या कैऱ्या तोडल्या.

त्यावेळी सालदार प्रवीणने मुलाला जाब विचारला. शेतमालक गोपीला त्याने फोन करून शेतात बोलावून घेतले. नंतर दोघांनी मुलाला मारहाण करत दोराच्या सहाय्याने चिकूच्या झाडाला बांधले. यावेळी शेतमालक गोपीने त्याच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ काढला. तसेच त्याच्या पॅंटमध्ये व अंगावर लघवी केली.

व्हिडिओ व्हॉट्सअपवर व्हायरल केला. पुन्हा कैऱ्या तोडायला आला तर हातपाय तोडण्याची धमकी दिली. या घटनेनंतर पीडित मुलाने घडलेला प्रकार मामा व आजीला सांगितला. नंतर दुसऱ्या दिवशी 6 जून रोजी याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानंतर संशयित आरोपींविरुद्ध ॲट्रोसिटी कायद्यासह इतर कलमान्वये गुन्हा दाखल झाला.

ॲट्रोसिटी कायद्यासह इतर गुन्हे... पोलीस अधीक्षक

अंजनविहिरे येथ आंबे तोडले म्हणून मागासवर्गीय समाजाला झाडाला बांधून मारहाण केली तसेच व्हिडीओ चित्रीकरण करून व्हायरल केल्या प्रकरणी शेतमालक आणि सालदाराविरुद्ध ॲट्रोसिटी कायद्यासह इतर गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली आहे आणि पुढील तपास चालू असल्याची माहिती जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ प्रवीण मुंडे यांनी दिली आहे.

Similar News