आदिवासी विकास मंत्र्यांची पालघरमधील पीडित कुटूंबियांकडे पाठ
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना उपचाराअभावी आदिवासी महिलेच्या जुळ्या बालकांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने आरोग्य विभागाचा प्रश्न ऐरणीवर आला. तर या प्रकारामुळे संपुर्ण महाराष्ट्राने हळहळ व्यक्त केली. मात्र आदिवासी विकास मंत्र्यांनी पीडित कुटूंबियांकडे पाठ फिरवली.;
पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील मर्कटवाडी या गावात रस्ता नसल्याने आदिवासी महिलेच्या जुळ्या बालकांचा वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू झाला. या घटनेमुळे संपुर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली. त्यानंतर या घटनेची मुख्यमंत्र्यांनी दखल घेत आदेश दिले. मात्र आदिवासी विकास मंत्री पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतानाही त्यांनी पीडित कुटूंबियांची सांत्वनपर भेट घेतली नाही. त्यामुळे आदिवासी विकास मंत्र्यांची संवेदनहीनता समोर आला असल्याचे सांगत नागरिकांनी संताप व्यक्त केला.
पालघर जिल्ह्यातील आदिवासी महिलेला वेळेत उपचार न मिळाल्याने दोन जुळ्या बालकांना प्रसूती दरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला. या घटनेचा आढावा घेण्यासाठी आदिवासी विकास मंत्री विजय कुमार गावित 21 तारखेला पालघरात आले होते. यावेळी पीडित कुटूंबाची भेट घेऊन मंत्री सांत्वन करतील अशी नागरिकांची अपेक्षा होती. मात्र याकडे त्यांनी पाठ फिरवल्याने त्यांचा संवेदनाहीन कारभार चव्हाट्यावर आला असल्याचा आरोप करत नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
मोखाडा तालुक्यातील मर्कटवाडीला रस्ता नसल्याने, वंदना यशवंत बुधर या सात महिन्याच्या गरोदर मातेला प्रसूतीच्या कळा सुरु झाल्या. यावेळी कुटुंबियांनी तत्काळ आशा सेविकेला संपर्क केला. आशा सेविकाही महिलेच्या घरी पोहोचली. तिने 108 एमबुलन्स सुद्धा बोलावली. मात्र मुख्य रस्ता ते मर्कटवाडी गावात जाण्यासाठी रस्ता नव्हता. दरम्यान महिलेला खूपच वेदना होत होत्या. त्यावेळी महिलेची प्रसूती घरातच झाली. मात्र यावेळी तिने जुळ्या बालकांना जन्मही दिला. परंतू वेळेत उपचार न मिळाल्याने बालकांचा मृत्यू झाला. त्याचे पडसाद महाराष्ट्रभर उमटले. तर मुख्यमंत्र्यांनी या घटनेची दखल घेतली. त्यानंतर खासदार राजेंद्र गावित यांनीही या घटनेबद्दल चिंता व्यक्त केली. तर आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित हे या घटनेच्या आढावा बैठकीसाठी पालघर येथे आले होते. यावेळी त्यांनी अनेक आश्वासने दिली. मात्र यावेळी त्यांनी पीडित कुटूंबियांची भेट न घेतल्याने त्यांच्या संवेदनशीलतेवर प्रश्न उपस्थित करत नागरिकांनी संताप व्यक्त केला.