कोरोनाच्या संकटाबरोबरच राज्यात राजकीय संकटाचे ढग दाटून आले आहेत. उद्धव ठाकरे यांचे पद घटनात्मक पेचात अडकले आहे. कोणत्याही व्यक्तीने मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर त्या मंत्र्यांना 6 महिन्याच्या आत विधानसभा किंवा विधानपरिषदेचं सदस्य व्हावं लागतं. उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर 6 महिन्याच्या आत त्यांना विधानसभा आणि विधानपरिषदेचं सदस्य होणं गरजेचं आहे. मात्र, कोरोना व्हायरस चा देशात प्रकोप सुरु असल्यानं राज्यात कोणतीही निवडणूक होणार नाही. अशा परिस्थितीत राज्यात घटनात्मक पेच निर्माण झाला आहे.
त्यामुळं महाविकास आघाडी ने राज्यपाल कोट्यातील रिक्त असलेल्या 2 जागांपैकी एका जागेवर उद्धव ठाकरे यांची निवड करावी. असा ठराव मंत्रीमंडळाच्या बैठकीत दुसऱ्यांदा पार करुन राज्यपालांकडे पाठवला आहे. त्यामुळं या सगळ्या घडामोडी घडत असताना दुसऱ्यांदा पाठवलेल्या ठरावावर राज्यपाल नक्की कोणता निर्णय घेतात. याकडं सर्वांचं लक्ष लागलेलं असताना देवेंद्र फडणवीस वारंवार राज्यपालांची भेट घेत आहे. यावरुन राजभवन हे फालतू राजकारणाचा अड्डा बनू नये असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
त्यातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन करुन...
“करोनाचं संकट असताना महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण होणं योग्य नाही असं सांगत उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदींकडे मध्यस्थी करण्याची विनंती केली. त्याचबरोबर आपण मध्यस्थी केली नाही, तर मला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागेल,”
असं उद्धव ठाकरे यांनी मोदींना सांगितलं आहे. यावर मोदी यांनी “या प्रकरणात आपण लक्ष घालू” असं आश्वासन उद्धव ठाकरे यांना दिलं आहे. या संदर्भात ANI या वृत्त संस्थेने ट्वीट केलं आहे.
Maharashtra CM Uddhav Thackeray called PM about his nomination. He asked for help, saying if it doesn’t happen he will have to resign. PM said he will look at the matter and get more details: Sources tell ANI (File pics) pic.twitter.com/GPUgx62CG8
— ANI (@ANI) April 29, 2020
हे ही वाचा:
मोदी उद्धव ठाकरेंचं ऐकणार का?
विशेष बाब म्हणजे राज्यमंत्रीमंडळाने उद्धव ठाकरे यांना आमदार करण्याचा ठराव दुसऱ्यांदा राज्यपालांकडे पाठवला आहे. त्यानंतर महाविकास आघाडीतील मंत्र्यांच्या शिष्टमंडळाने देखील राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. या शिष्टमंडळाला राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी ‘बघूया..विचार करतो..अजून बरेच दिवस शिल्लक आहेत..' अशी उत्तरं दिली आहेत.
कोरोनाच्या संकटात राज्याला स्थैर्याची गरज असल्यानं घटनात्मक पेच टाळण्यासाठी मंत्रीमंडळाच्या शिफारशीबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा. अशी विनंती या शिष्टमंडळाने राज्यपालांना केली होती. मात्र, राज्यपालांनी राज्य संकटात असताना मुख्यमंत्र्यांच्या डोक्यावर राजकीय अस्थिरतेचं संकट कायम ठेवलं आहे.
त्यामुळं उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन केल्याचं समजतंय. दरम्यान या फोन कॉल अगोदर उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा केली होती.