पाली सुधागडात राष्ट्रवादी महिला आघाडीकडून प्रविण दरेकर यांचा निषेध

Update: 2021-09-15 09:10 GMT

पाली :  विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप करीत पाली सुधागड सह जिल्ह्यात राष्ट्रवादी महिला आघाडीतर्फे निषेध नोंदविला आहे. प्रवीण दरेकर यांनी समस्त महिला वर्गाची माफी मागावी अशी मागणी संतप्त महिला पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केली. यावेळी बोलताना गीताताई पालरेचा म्हणाल्या की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांच्या नेतृत्वाखाली तसेच पालकमंत्री आदिती ताई तटकरे व रायगड जिल्हा निरीक्षक रुपालीताई दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा निषेध दर्शविला जात आहे. महाराष्ट्र ही थोर साधू संतांची भूमी आहे, माँसाहेब जिजाऊ , क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांचा उज्वल वारसा आम्हाला लाभला आहे. प्रवीण दरेकर यांना महिलांचा सन्मान राखता येत नसेल तर त्यांनी अपमान देखील करू नये, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नेहमीच महिलांचा सन्मान केला आहे. जिल्ह्यात खा.सुनिल तटकरे यांच्या कणखर नेतृत्वात महिलांना समाजकारण व राजकारणात प्रभावीपणे काम करण्याची संधी मिळवून दिली आहे.

ज्येष्ठ व वरिष्ठ नेत्यांनी वक्तव्ये करताना भान राखले पाहिजे,संस्कार व संस्कृती जपण्याची नैतिक जबाबदारी प्रत्येकाची आहे, यापुढे अशी बेताल वक्तव्ये खपवून घेतली जाणार नाहीत असा इशारा जिल्हाध्यक्ष पालरेचा यांनी दिला.

माजी सभापती साक्षीताई दिघे म्हणाल्या की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आम्हाला 50 टक्के आरक्षण देऊन प्रतिष्ठा व सन्मान मिळवून दिला आहे. आज महिला विविध क्षेत्रात आघाडीवर असल्याचे दिसतात. आपण देखील मातेच्या पोटी जन्माला आलोय, आपल्या आई, बहीण, मावशी , काकी याप्रमाणे सर्वाचा आदर राखला जावा, संस्काराची दिशा नसल्याने अशा प्रकारची बेताल व चुकीची वक्तव्ये होत असल्याची भूमिका दिघे यांनी मांडली. यावेळी माजी सभापती साक्षी ताई दिघे, अस्मिता घरत, अंकिता मोरे, वैभवी साखरले, आदींनी विचार मांडले.

यावेळी राष्ट्रवादी महिला रायगड जिल्हा अध्यक्षा गीताताई पालरेचा,माजी सभापती साक्षीताई दिघे, सुधागड तालुका महिला अध्यक्षा रुपाली भणगे, पाली शहर अध्यक्ष सुजाता वडके आदींसह महिला व पदाधिकारी उपस्थित होते.

Tags:    

Similar News