संजय राऊत यांना अटक, आज कोर्टात हजर करणार

Update: 2022-08-01 02:58 GMT

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना EDने अखेर रात्री उशिरा अटक केली. राऊत यांच्या घरी ED चे अधिकारी रविवारी सकाळी दाखल झाले होते. दिवसभर केलेल्या चौकशीनंतर राऊत यांना संध्याकाळी Ed च्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरू होती आणि एक वाजण्याच्या सुमारास संजय राऊत यांना अधिकृतपणे अटक करण्यात आली. वैद्यकीय चाचणीसाठी संजय राऊत यांना सकाळी नऊ वाजता जे जे रुग्णालयात नेण्यात येणार आहे.

गोरेगावमधील पत्रावाला चाळ प्रकरणी संजय राऊत यांना अटक करण्यात आली आहे. सुमारे एक हजार कोटींच्या या घोटाळ्याशी संजय राऊत यांचा संबंध असल्याचा संशय आहे. या घोटाळ्यातील आरोपीने संजय राऊत यांच्या पत्नीच्या खात्यामध्ये लाखो रुपये वळते केले असल्याने ही चौकशी सुरू आहे.

रात्री उशिरा संजय राऊत यांच्या भेटीसाठी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत हे ईडी कार्यालयात पोहोचले होते. संजय राऊत यांच्यावरील कारवाईमुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी ईडीविरोधात तीव्र निदर्शने देखील केली. Ed कार्यालयात दाखल होण्याआधी संजय राऊत यांनी आपण कारवाईला घाबरणार नाही आणि शिवसेना सोडणार नाही, असा निर्धार व्यक्त केला होता.

Similar News