Ram Mandir Pranpratistha : राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दिवशी देशात काय सुरू आणि काय बंद? जाणून घ्या सविस्तर

देशात उत्सवाचं वातावरण आहे कारण येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. या सोहळ्यासाठी जय्यत तयारी केली जात आहे.;

Update: 2024-01-20 05:42 GMT


आयोध्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा (Ayodhya Ram Mandir) सोहळा : देशात आनंद आणि उत्सवाचं वातावरण आहे येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. या सोहळ्यासाठी जय्यत तयारी केली जात आहे. यादरम्यान राज्य आणि केंद्र सरकारसह इतर अनेक संस्थांनी अनेक घोषणा केल्या असून, २२ जानेवारी रोजी सार्वजनिक ठिकाणे आणि सरकारी कार्यालये बंद ठेवण्याबद्दल आणि कामकाजाच्या वेळेची माहिती त्यांच्याकडून देण्यात आली आहे.  

अयोध्या येथील राम मंदिरातील प्राण प्रतिष्ठा सोहळा पाहण्यासाठी देशभरातील नागरिक सज्ज झाले आहेत. देशभरात हा ऐतिहासिक सुवर्ण दिन साजरा करण्याची तयारी सुरू असताना, राम मंदिर सोहळ्याच्या दिवशी काय सुरू आहे आणि काय बंद आहे याच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

शेअर मार्केट

सोमवारी शेअर बाजार बंद राहणार आहे. मात्र, शनिवारी सकाळी ९ ते दुपारी ३.३० वाजेपर्यंत बाजार सुरू राहणार आहे. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजने एका परिपत्रकात म्हटले आहे की, करन्सी डेरिव्हेटिव्ह सेगमेंट २२ जानेवारी रोजी बंद राहणार आहे. भारतीय शेअर बाजारात शनिवार, २० जानेवारी रोजी पूर्ण ट्रेडिंग सेशन असेल.

मनी मार्केट

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) शुक्रवारी जाहीर केले की, २२ जानेवारी रोजी मनी मार्केट बंद राहणार आहे. रिझर्व्ह बँकेने नव्या परिपत्रकात म्हटले आहे की, त्या दिवशी सरकारी रोख (प्राथमिक आणि सेकंडरी), परकीय चलन, मनी मार्केट आणि रुपी इंटरेस्ट रेट डेरिव्हेटिव्हमध्ये कोणतेही व्यवहार आणि सेटलमेंट होणार नाहीत.

आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी घेण्यात आलेला तीन दिवसांचा व्हेरिएबल रेट रेपो (व्हीआरआर) लिलाव आता २३ जानेवारीला होणार आहे. तसेच यापूर्वी जाहीर करण्यात आलेला तीन दिवसांचा व्हीआरआर लिलाव रद्द करण्यात आला आहे. त्याऐवजी २३ जानेवारीला दोन दिवसांचा व्हीआरआर लिलाव होणार आहे.

शासकीय कार्यालये व संस्था

केंद्र सरकारने सोमवारी, २२ जानेवारी रोजी देशभरातील सर्व केंद्र सरकारची कार्यालये, केंद्रीय संस्था आणि केंद्रीय औद्योगिक आस्थापना अर्धा दिवस बंद ठेवण्याची घोषणा केली.

अयोध्येतील आगामी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात कर्मचाऱ्यांना सहभागी होता यावे, यासाठी सरकारने २२ जानेवारी २०२४ रोजी दुपारी अडीच वाजेपर्यंत अर्धा दिवस बंद ठेवण्याची घोषणा केली आहे.

अर्थ मंत्रालयाच्या आदेशानुसार २२ जानेवारी २०२४ रोजी केंद्र सरकारची कार्यालये, केंद्रीय संस्था आणि केंद्रीय औद्योगिक आस्थापनांसाठी दुपारी २.३० वाजेपर्यंत अर्धा दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

बँका, विमा कंपन्या

देशभरातील सार्वजनिक क्षेत्रातील बँका, विमा कंपन्या, वित्तीय संस्था आणि रिजनल रुरल बँका (आरआरबी) २२ जानेवारी रोजी अर्धा दिवस बंद राहतील.

अर्थ मंत्रालयाच्या अधिसूचनेत म्हटले आहे की, हे केंद्रीय संस्था आणि केंद्रीय औद्योगिक आस्थापनांसंदर्भात डीओपीटीचा आदेश सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँका/सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपन्या/सार्वजनिक क्षेत्रातील वित्तीय संस्था आणि रिजनल रुरल बँकाना देखील लागू होईल जेणेकरून कर्मचाऱ्यांना रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी होता येईल.

खाजगी कार्यालये

अब्जाधीश मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने सोमवारी, २२ जानेवारी रोजी देशभरातील आपल्या सर्व कार्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.

येथे सार्वजनिक सुट्टी

बहुतांश राज्यांनी २२ जानेवारीला अर्धा दिवस किंवा सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. हरीयाणा आणि राजस्थानने आपल्या कर्मचाऱ्यांना अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर केली असून महाराष्ट्र, पुद्दुचेरी आणि चंदीगडमध्ये या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

शाळा आणि महाविद्यालये

हरियाणा सरकारने एक अधिसूचना जारी केली आहे, ज्यानुसार सर्व विभाग, बोर्ड्स, कॉर्पोरेशन, शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये दुपारी २.३० वाजेपर्यंत अर्धा दिवस सुट्टी असेल.

मध्य प्रदेशात शालेय व उच्च शिक्षण विभागाने २२ जानेवारी रोजी शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यासाठी दोन स्वतंत्र अधिसूचना जारी केल्या होत्या.

दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाने अयोध्येतील रामलल्ला प्राण प्रतिष्ठापनेनिमित्त २२ जानेवारी रोजी दुपारी अडीच वाजेपर्यंत अर्धा दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

उत्तर प्रदेश सरकारने २२ जानेवारी रोजी राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. तसेच महाराष्ट्र, गोवा आणि छत्तीसगड या राज्यांनी शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.

Tags:    

Similar News