लाल बूंद भट्टीसमोर जीव धोक्यात घालून तयारी केलेली भांडी विकेनात, कामगार अस्वस्थ
कोरोनाच्या पहिल्या आणि दुसरी लाटेमुळे आता ग्रामीण भागातील पारंपरिक व्यवसाय बंद पडत चालले आहेत. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. ग्रामीण भागात पूजेसाठी तसेच आयुर्वेदात महत्व असलेल्या तांबे आणि कथिल या धातूंच्या मिश्रणातून बनवल्या जाणाऱ्या कास्याची ताट, वाट्या तयार करणारा मोठा वर्ग ग्रामीण भागात राहतो. हे लोक ही ताट तयार करुन विकत असतात. मात्र, लॉकडाऊनमुळे या लोकांचा पारंपरिक व्यवसाय धोक्यात आला आहे.
हे ताट तयार करणं सोप्पं काम नसतं. यासाठी अक्षरश: ही लोक जीव धोक्यात घालून भट्टीवर वस्तू तयार करतात. मात्र, जीव धोक्यात घालून तयार केलेली ही भांडी आता लॉकडाऊनमुळे तशीच पडून आहेत. त्यामुळे या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यावसायिकांचं तसंच कामगारांचं मोठं नुकसान होत आहे.
लॉकडाऊनमुळे इतर वस्तू प्रमाणेच कांस्याच्या भांड्याची मागणी घटली आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील रावेर येथील हा पारंपारिक व्यवसाय हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे.