औरंगाबाद जिल्ह्यात 31 मार्चच्या रात्रीपासून लागणारा लॉकडाऊन जिल्हा प्रशासनाने स्थगित केला आहे. पुढील आदेश येईपर्यंत हा लॉकडाऊन स्थगित करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली. औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता जिल्हा प्रशासनाने 31 मार्चपासून दहा दिवसांचा लॉकडाऊन लावण्याची घोषणा केली होती. मात्र या निर्णयाला लोकप्रतिनिधींनी विरोध केला होता. तर औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी थेट आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. लोकप्रतिनिधींचा विरोध होत असल्याने प्रशासनाने एक पाऊल मागे घेत, 31 मार्चपासून लागणारा लॉकडाऊन पुढील आदेशापर्यंत स्थगित केला असल्याचं बोलले जात आहे.
मंगळवारी झालेल्या लोकप्रतिनिधीं सोबतच्या बैठकीत विविध प्रश्नांवर चर्चा झाली. तसेच राज्याचे मुख्यमंत्री, पालकमंत्री , मुख्य सचिव आणि मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव, यांच्यासोबत झालेल्या चर्चेअंती लॉकडाऊन पुढील आदेश येईपर्यंत स्थगित करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे.
कोरोनाच्या वाढत्या रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी दहा दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता, परंतु लोकप्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. यामध्ये सामान्य नागरिकांना विचारात घेऊन निर्णय घेण्यात आला आहे. शासन लवकरच कोविड 19 नियमावलीबाबत सुधारित सूचना देणार आहे. नव्याने आदेश देण्यात येणार असून त्या सूचनांचे पालन करण्यासाठी अवधी लागणार असल्याने मंगळवारी रात्री लागणारा लॉकडाऊन पुढील आदेश येईपर्यंत स्थगित करण्यात आला आहे. या दरम्यान सध्या लागू असलेला आदेश नियमित सुरू राहणार आहेत, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.