13 हजार रिक्षा चालकांचा बेमुदत बंदचा इशारा ; RTO चे नवे दरपत्रक अमान्य

Update: 2021-12-15 02:32 GMT

अंबरनाथ // बदलापूर,अंबरनाथ या दोन शहरामध्ये तब्बल 13 हजार रिक्षा चालक दोन दिवसात बेमुदत बंद करणार आहेत. कल्याण RTO च्या नव्या दर पत्रकांविरोधात अंबरनाथ आणि बदलापूर येथील रिक्षा चालक संघटनांनी आंदोलनाबाबत आपली भूमिका मांडली.

कल्याण आरटीओने काही दिवसांपूर्वीच शेअर रिक्षांसाठी असलेल्या भाडे दरात मोठी कपात केली होती.यावरून रिक्षा चालक संघटनांनी नाराजी व्यक्त केली. या नव्या दरपत्रकात अंबरनाथ आणि बदलापुर शहरांसह डोंबिवली, कल्याण आणि उल्हासनगर शहरातील भाडे दर सुद्धा कमी करण्यात आले होते. या भाडे कपातीचं प्रवाशांनी स्वागत केलं असलं, तरीही रिक्षा संघटनांनी मात्र, या भाडे कपातीचा विरोध केला आहे.

कल्याण RTO ने ज्या सर्वेक्षणानुसार ही दर निश्चिती केली, ते सर्वेक्षण 2015 साली झालेलं असून त्यावेळी असलेले गॅसचे दर आणि महागाई ही आज 6 वर्षांनी जवळपास दुप्पट झालेली आहे. त्यामुळे कल्याण आरटीओने जारी केलेले हे नवे दर हे आम्हाला परवडण्यासारखे नसल्याची भूमिका अंबरनाथ आणि बदलापूर शहरातील रिक्षा संघटनांनी घेतली आहे. हे दर निश्चित करताना आम्हाला विश्वासात घेतले नसल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.

RTO ने जारी केलेले नवीन दर मागे न घेतल्यास येत्या काळात अंबरनाथ आणि बदलापूर शहरात रिक्षांचा बेमुदत संप पुकारण्याचा इशारा रिक्षा संघटनांनी दिला आहे. दोन्ही शहरातील मिळून जवळपास 13 हजार रिक्षाचालक यात सहभागी होतील, अशी माहिती रिक्षा संघटनांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे.

Tags:    

Similar News