देशात नावाजलेल्या वाबळेवाडी शाळेत आर्थिक गैरव्यवहार?
देशात नावजलेल्या पुणे जिल्ह्यातील वाबळेवाडी जिल्हा परिषद शाळेत आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.;
वाबळेवाडी// पुणे जिल्ह्यातील वाबळेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ही आपल्या वेगवेगळ्या उपक्रमामुळे राज्यातच नाही तर संपुर्ण देशात नावाजलेली आहे. मात्र, आता या शाळेत प्रवेश घेण्यासाठी पाच हजार ते पंचवीस हजार रुपये रोख स्वरूपात शाळा सुधार निधीच्या नावाखाली घेतली जात असल्याचा आरोप झाल्याने शाळा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. विशेष म्हणजे शाळा सुधार निधीची रक्कम ही शाळा व्यवस्थापन समितीच्या बँक खात्यात जमा करण्याऐवजी खाजगी व्यक्तीच्या नावे जमा करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
वाबळेवाडी शाळेचा राज्यातच नव्हे तर देशात नावलौकीक मिळवून देण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक दत्तात्रय वारे यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत. मात्र आता शाळेत प्रवेश मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैशांचा गैरव्यवहार होत असल्याचा आरोप झाल्यानंतर त्यांनी उद्विग्न होऊन राजीनामा दिला आहे. त्यांच्यासह त्यांच्या सहकारी शिक्षकांनी देखील राजानामा दिला आहे. त्यामुळे हे प्रकरण चांगलेच तापले आहे.
शाळेचा कायापालट करण्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या वारे गुरूजींनी संबधित पालकाकडून होणारे आरोप फेटाळून लावत, पैशाची जबाबदारी आम्ही घेतली नव्हती, पैसाचा विषय आला की, त्या सोबत आरोप आणि गैरव्यवहाराचे प्रकार समोर येतात त्यामुळे ही संपुर्ण जबाबदारी आम्ही शाळा व्यवस्थापन समितीकडे दिली होती. त्यामुळे या प्रकरणाशी आमचा काही संबध नसतांना
आमची सामाजात बदनामी होत असल्याने आम्ही राजीनामा दिल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.
तर स्थानिक विद्यार्थ्यांना प्रवेश टाळला जात होता मात्र, धन दांडग्या लोकांना या शाळेत प्रवेश दिला जातो असा आरोप येथील एका पालकांने केला आहे. सोबतच माझ्या पाल्याच्या प्रवेशासाठी माझ्याकडून 25 हजारांची मागणी केल्याचा आरोप देखील पालकाने केला आहे.
दरम्यान जिल्हा परिषदेकडे अनेक पालकांनी लेखी आणि तोंडी तक्रारी केल्यानंतर शिरूर तालुका गटशिक्षणाधिकारी विजयसिंह नलावडे यांनी व्यवहार तपासले असता आर्थिक व्यवहारात अनियमितता असल्याचा अहवाल दिला आहे. याबाबत आता जिल्हा परिषद शाळेतील प्रशासकीय आर्थिक आणि अभिलेखांच्या सखोल चौकशी करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी पाच सदस्यीय समिती जिल्हास्तरीय स्थापन केली आहे.
दरम्यान आता देशात नावारूपाला आलेल्या शाळेत घडलेल्या या प्रकारामुळे राज्यभर चर्चेचा विषय बनला आहे.