जामीन मिळून वर्ष झालं तरी तुरूंगातच होता कैदी...! काय आहे नक्की प्रकरण? वाचा

Update: 2024-02-28 15:32 GMT


मुंबई Prisoner of Telangana: अंमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणात अडकलेल्या तेलंगणातील एक आरोपीला एक वर्षापूर्वी जामीन मिळाला. मात्र, तरीसुद्धा त्याची तुरुंगातून सुटका झालेली नव्हती. ही बाब विशेष सत्र न्यायालयाच्या लक्षात येताच आरोपीची तातडीने सुटका करण्याचा निर्णय न्यायालयाने दिला आहे.

याबाबात सविस्तर माहिती अशी की, तेलंगणातील आरोपी रामा कृष्णा मकेना वर सीमाशुल्क विभागाने (कस्टम विभाग) गांजा जप्त करत 2022 मध्ये आरोप केला होता. अंमली पदार्थ प्रतिबंध 1985 कायद्यानुसार त्याच्यावर खटला सुरू झाला. तो मूळचा तेलंगाणा राज्यातील विहंगा, गडचोबाऊली, हैदरागुडा येथील रहिवाशी असुन अमेरिकेतून भारतीय टपालाद्वारे गांजा तस्करी करण्याचा त्याच्यावर आरोप ठेवण्यात आलेला होता. एक वर्षांपूर्वीच 8 फेब्रुवारी 2023 रोजी त्याचा जामीन मंजूर झाला. मात्र, महाराष्ट्रात त्याचं कुणीही जवळचं नातेवाईक नसल्यामुळे त्याची सुटका रखडली होती. अखेर मुंबई सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी त्याची परिस्थिती समजून घेत तातडीनं सुटका करण्याचा निर्णय दिला.

मुंबईत आरोपीचे कुणीही नातेवाईक किंवा ओळखीचं नव्हतं. त्यामुळे लीगल सर्विसच्या वतीनं त्याच्या बाजूनं वकील भाग्येशा कुरणे यांनी बाजू मांडली आणि न्यायालयानं जामीन मंजूर केला होता. पण तरीदेखील जामिनासाठीचे पन्नास हजार रुपये रक्कम भरण्यासाठी त्याचे कोणीही ओळखीचे जवळचे नातेवाईक येथे नव्हते. आई-वडील 84 वर्षांचे वृद्ध. तेही तेलंगणात असल्यामुळे त्याची सुटका होऊ शकत नव्हती. वकिलांनी ही बाब न्यायालयाच्या नजरेस आणून दिली त्यामूळे या सगळ्या परिस्थितीचा विचार करून मुंबई सत्र न्यायालयाने त्याला तात्काळ सुटका करण्याचा निर्णय जारी केला.

Tags:    

Similar News