काँग्रेस महाविकास आघाडी सरकारमध्ये नाराज, काँग्रेस नेत्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

महाविकास आघाडीत काँग्रेस मंत्र्यांना आणि आमदारांना विकासकामांसाठी निधी मिळत नाही. त्यामुळे नाराज काँग्रेस नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.;

Update: 2022-02-17 15:30 GMT

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. त्यामुळे शिवसेना घायाळ झाली असतानाच महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेसच्या नाराज नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. तर मुख्यमंत्र्यांशी झालेल्या भेटीनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले की, विकासकामांसाठी काँग्रेसच्या मंत्री व आमदारांना देण्यात येणारा निधी, महामंडळांचे वाटप यावर मुख्यमंत्र्याशी चर्चा झाली. त्याबाबत मुख्यमंत्र्यांनी समाधानकारक तोडगा काढला जाईल, असे आश्वासन दिले. मात्र काँग्रेसमध्ये सरकारविषयी नाराजी नसल्याचे सारवासारव नाना पटोले यांनी केली.

मुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीनंतर राज्य मंत्रीमंडळात बदलाविषयी कोणतीही चर्चा झाली असल्याच्या वृत्ताचा पटोले यांनी इन्कार केला. तसेच मंत्र्यांच्या कामाचा लेखाजोखा हायकमांडक़डे असतो. त्यामुळे कोणाला संधी द्यायची किंवा कोणाला डच्चू द्यायचा याबाबत हायकमांड निर्णय घेईल, असे मत नाना पटोले यांनी व्यक्त केले.

नाना पटोले यांना हिजाब विषयी प्रश्न विचारला असता सध्या हिजाब पेक्षा सर्व जाती धर्मांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे गेल्या 8 वर्षांचा हिसाब मागावा, असे मत व्यक्त केले. तर गेल्या 8 वर्षात देशात महागाई, बेरोजगारी, यासह सरकारी कंपन्या विक्री केल्याचा हिशोब नागरीकांनी मागण्याची वेळ आली आहे.त्यामुळे हिजाब सारख्या गोष्टींना महत्व देण्यापेक्षा पोटासाठी महत्वाच्या असलेल्या गोष्टींना महत्व देण्याची गरज आहे, असे पटोले यांनी सांगितले.

काँग्रेसच्या मंत्र्यांचे काम चांगले आहे. मात्र सध्या विकासकामांसाठी मिळत असलेला कमी निधी आणि महामंडळांचे वाटप याबाबत सकारात्मक चर्चा झाली असून हा प्रश्न लवकरात लवकर सोडवण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्याचे नाना पटोले यांनी सांगितले.

अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या पार्श्वभुमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. तर या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची निवडणूक होणार आहे. त्यापार्श्वभुमीवर मतफुटी होऊ नये यासाठी काँग्रेस प्रयत्नशील आहे. त्यापार्श्वभुमीवर काँग्रेस नेत्यांनी घेतलेली मुख्यमंत्र्यांची भेट महत्वाची मानली जात आहे. 

Tags:    

Similar News