गृहराज्यमंत्री दीपक केसरकर आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यातील संघर्ष तीव्र
शिवसेना नेते आणि माजी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यातील संघर्ष तीव्र होताना पाहायला मिळत आहे. 'राणेंना दीपक केसरकर असा प्रश्न पडत असेल तर राणेंनी त्यांचा आणि त्यांच्या मुलाचा खासदारकीत झालेला पराभव आठवावा' , असा खोचक टोला केसरकरांनी राणेंना लगावला आहे;
मुंबई// शिवसेना नेते आणि माजी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यातील संघर्ष तीव्र होताना पाहायला मिळत आहे. 'राणेंना दीपक केसरकर असा प्रश्न पडत असेल तर राणेंनी त्यांचा आणि त्यांच्या मुलाचा खासदारकीत झालेला पराभव आठवावा' , असा खोचक टोला केसरकरांनी राणेंना लगावला आहे.
पुढे बोलताना केसरकर म्हणाले की, "नारायण राणेंनी मला कितीही हिणवलं तर संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे मी राणेंचा दहशतवाद मोडून काढला. ते माझे व्यक्तिगत शत्रू नाही, आजही मी राणेंच्या मुलांना सुधरा म्हणून सांगतो. सुधारले तरच मुलांचं पुढचं आयुष्य चांगलं असेल. अन्यथा जसा नारायण राणे यांचा राजकीय अंत झाला, तसाच राणेंच्या मुलांच्या राजकीय कारकीर्दीचाही अंत होईल" असं केसरकरांनी म्हटले आहे.
सोबतच केसरकर पुढे म्हणाले की, "आज नारायण राणे यांची मुलं कशी वागतात, स्वतः विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना असा पोरकटपणा करू नका म्हणत झापलं. अजूनही नारायण राणे त्यांच्या मुलांवर नियंत्रण आणू शकले नाही"
"राणेंनी मला डीपीसीच्या बैठकीत हिणवलं होतं, तेव्हा मी त्यांना स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की, आज तुम्ही ज्या खुर्चीत बसला आहात त्याच खुर्चीवर मी बसेल आणि तेव्हा राणे सभागृहात नसतील. हे नियतीने खरं करून दाखवलं आहे," असंही केसरकर यांनी नमूद केलं.