शिखंडीसारखे युध्द करण्यापेक्षा समोरासमोर या, सामनातून भाजपला आव्हान

आम्ही भ्रष्टाचाराविरोधात युध्द पुकारले आहे असे भाजप नेते सांगत आहेत. त्याचा शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून शिखंडीचे युध्द असे म्हणत समाचार घेण्यात आला आहे.

Update: 2022-02-26 03:44 GMT

 राज्यात भाजप विरुध्द महाविकास आघाडी सामाना रंगला आहे. त्यातच भाजप केंद्रीय यंत्रणांचा महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात वापर करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. तर शिवसेनेचे मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यावर आयकर विभागाने छापा टाकला, त्यावर संताप व्यक्त करत शिवसेनेचे मुखपत्र सामनातून शिखंडीसारखे युध्द करण्यापेक्षा समोरासमोर या, असे आव्हान भाजपला देण्यात आले आहे.

राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात भाजप ईडीचा प्रयोग करत असल्याचा आरोप राज्यातील महाविकास आघाडीचे नेते करत आहेत. त्याचा समाचार सामनाच्या अग्रलेखातून घेतला आहे. तर शिखंडीचे युध्द या शीर्षकाखाली लिहीलेल्या अग्रलेखात म्हटले आहे की, केंद्रीय तपास यंत्रणा म्हणजे शिखंडींच्या हातातील हत्यारे झाली आहेत. पण यापासून देशाला धोका आहे. महाराष्ट्रासारख्या राज्याची बदनामी करण्यासाठी शिखंडी खालच्या पातळीला जाऊन राजकारण करतात, असा टोला भाजपला लगावला.

पुढे सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे की, शिखंडीच्या कमरेला धोतर आहे व त्याची गाठ कधीही सुटू शकते, हे भाजपने विसरू नये. विरोधात बोलणाऱ्यांचे दाऊशी संबंध जोडायचे आणि मनी लाँडरिंग प्रकरणी खोटे गुन्हे दाखल करायचे, त्यांची यथेच्छ बदनामी करायची असा प्रकार भाजपकडून सुरू आहे. कारण हे करणाऱ्यांच्या मनगटात ताकद नाही. दंडावरील बेडक्यांत जोर नाही. त्यामुळे शिखंडीला पुढे करून युध्द करायचे, असे म्हणत महाभारतातील पात्र शिखंडीचा संदर्भ देत भाजप केंद्रीय यंत्रणांच्या आडून खेळ करत असल्याचा टोला सामनातून केला आहे.

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून म्हटले आहे की, हिंमत असेल तर निधड्या छातीने पुढे या. आहे का हिंमत? असा सवाल सामनातून भाजपला केला आहे. तसेच रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युध्दासारखे भाजपने भ्रष्टाचाराविरोधात युध्द पुकारले असल्याचे भाजप नेते सांगतात. तर मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी आयकर विभागाने छापा टाकला. ते त्यांचा तपास करतील. मात्र पिंपरी चिंचवड महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे यांनी लाखो रुपयांची लाच घेतांना रंगेहात पकडले होते. ते जेल भोगून पुढील भ्रष्टाचार करण्यासाठी पदावर बसले, असे सांगत पुणे महापालिकेचे महापौर मुरलीधर मोहळ यांच्याही घोटाळ्याच्या सुरस कथा असल्याचा आरोप सामनातून केला.

पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत स्मार्ट सिटी योजनेत घोटाळ करून जनतेच्या पैशाची लूट सुरू आहे. तसेच नागपुर महापालिकाही या कामात मागे नाही. त्याबरोबरच नील सोमैया आणि किरीट सोमैया यांनी केलेला घोटाळा राकेश वाधवानच्या मदतीने तुरूंगात ढकलत नेणार, असे सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.

राज्याचे अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांना अटक करण्यात आल्यानंतर कर नाही तर डर कशाला असे भाजप सांगत होते. मग नील सोमैया यांनी अटक पुर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली. त्यावरून सामनातून भाजपवर कर नाही तर डर कशाला असे म्हणत निशाणा साधला आहे.

भाजपकडून महाविकास आघाडीचे पाच डझन नेते तुरूंगात जातील अशी घोषणा केली जाते. ही घोषणा केंद्रीय यंत्रणांचा वापर करूनच करतात ना? असा सवाल सामनातून विचारला आहे. त्यावरून आमचे नेते तुरूंगात जाणार मग तुमचे काय सिमल्याच्या बर्फात स्वर्गसुखाचा आनंद घेत बसणार का? असा प्रश्न सामनातून विचारला आहे.

किरीट सोमैया, नील सोमैया, प्रसाद लाड, पुण्याचे मोहोळ, गिरीश महाजन, मुनगंटीवारांचा झाड घोटाळा, अमोल काळे, विजय ढवंगाळे यांचा महापोर्टल घोटाळा, चंद्रकांत पाटील यांनवी सार्वजनिक बांधकाम, महसूलमंत्री म्हणून केलेले उद्योग कोणत्या डर्टी डझनमध्ये बसतात ते लवकरच कळेल, असे सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे. तसेच या युध्दाला युध्द म्हणायचे असेल तर समोर या आणि लढा, असे आव्हान सामनातून भाजपला दिले आहे.

Tags:    

Similar News