राज्यातील अनेक जिल्ह्यात सध्या महापुराने थैमान घातलेले आहे. शेती, उद्योगधंदे आणि सामान्य नागरिकांच्या मालमत्तेचेही मोठे नुकसान झाले आहे. याबाबत केंद्राकडून काही मदत मिळेल का अशी आशा असताना महाराष्ट्राला मोठा धक्का बसला आहे. राज्यात २ महिन्यांपूर्वी आलेले तौक्ते चक्रीवादळ आणि अतिवृष्टीने मोठे नुकसान झाले होते. यामुळे केंद्र सरकारकडून भरघोस मदतीची अपेक्षा महाराष्ट्राला होती. पण केंद्र सरकारने केवळ 700 कोटींचीच मदत दिली आहे.
तौक्ते चक्रीवादळाने गुजरात आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टी तसेच इतर जिल्ह्यांना मोठा फटका बसला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचा हवाई दौरा करून लगेच हजार कोटींची मदत जाहीर केली. मात्र त्यावेळी महाराष्ट्राला डावलण्यात आलं होतं. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीने प्रचंड नुकसान झाले आहे. राज्याला 3 हजार कोटी रुपयांची आर्थिक मदतीची गरज असतांना आता फक्त 700 कोटी तुटपुंजी मदत केंद्राने केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा वादळग्रस्त आणि पूरग्रस्तांच्या मदतीवरून राजकारण चांगलंच तापणार असे दिसते आहे.