भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात 8 जानेवारीला लागलेल्या आगीत शिशु केअर युनिटमध्ये 11 बालकांचा मृत्यू झाला होता. यातील एका बालकाचा उपचारादरम्यान बालकांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी समितीच्या अहवालानंतर सात जणांवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये कर्तव्यावर असणाऱ्या स्मिता आंबीलढुके आणि शुभांगी साठवणे या दोन नर्सवर गुन्हेगारी स्वरूपाचा निष्काळजीपणा केल्याचा ठपका तपासाअंती ठेवण्यात आला असून त्यांच्यावर कलम 304 (भाग 2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी स्मिता आंबीलढुके आणि शुभांगी साठवणे यांनी भंडारा येथील जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. यात स्मिता 28 जानेवारी तर शुभांगी ला 29 जानेवारीला अंतरिम जामीन मिळाला होता.
त्यानंतर पुन्हा एकदा तो जामीन रद्द करून दोघींना ताब्यात द्यावे, अशी मागणी पोलिसांनी केली आहे. त्यांच्या अर्जावर जिल्हा सत्र न्यायालय -1 चे विशेष न्यायाधीश पी. एस. खूने यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी दोन्ही पक्षाकडून युक्तिवाद करण्यात आला.
यावेली सरकारी पक्षाने काही महत्त्वाचे दस्तावेज सादर करण्यासाठी न्यायालयाकडे वेळ मागितला. यावेळी सुनावणी होईपर्यंत दोघींनाही अटक होणार नसल्याचे न्यायालयाने म्हटलं आहे. या संदर्भात पुढील सुनावणी 26 फेब्रुवारीला होणार आहे. तर आपली ह्या प्रकरणात कोणतीही चुकी नसून आपण निर्दोष सूटू असा विश्वास नर्सेस ने व्यक्त केला आहे. हे सर्व प्रकरणात राजकीय दबावापोटी आपल्या अशिलावर चुकीचे गुन्हे दाखल केल्याचे नर्स च्या वकीलांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितले.
या जळीत प्रकरणात 11 बालकांचा मृत्यू झाला असल्याने या सर्व प्रकरणाकडे नागरिकांचे लक्ष लागले असून 26 फेब्रूवारी ला न्यायालयाची भूमिका स्पष्ट होणार आहे.