अर्णब गोस्वामी आणि अभिनेत्री कंगना रानावतविरोधात शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी यांनी दाखल केलेल्या हक्कभंगासंदर्भात समितीला मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव एकमतानं मंजूर करण्यात आला. राज्याच्या मुख्यमंत्र्यांविरुद्ध कुणी अपशब्द वापरले किंवा आक्षेपार्ह भाषा वापरली तर तो राज्याचा आणि विधिमंडळाचा अवमान आहे, असे मत विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले आहे.
विधिमंडळाच्या अधिवेशनात मंगळवारी विधानसभेचे कामकाज सुरू होताच हक्कभंगाचा मुद्दा चर्चेत आला. विरोधी पक्षाचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी अर्णब गोस्वामी आणि कंगनाविरोधात हक्कभंग प्रस्तावाला विरोध केला. एखाद्या व्यक्तीविरुद्ध कुणी सभागृबाहेर काही वक्तव्य केले तर त्या व्यक्तीविरुद्ध कायदेशीर कारवाई करता येते, मग हक्कभंगाचा वापर कशाला असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
यावर अध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांचा अवमान केला गेल्याचा मुद्दा मांडत हक्कभंगाचे समर्थन केले. या चर्चेदरम्यान मंत्री छगन भुजबळ यांनी हक्कभंगासंदर्भात समितीला मुदतवाढ देण्याच प्रस्ताव आहे, त्याला मंजुरी द्यावी अशी विनंती केल्यानंतर हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.