सध्या आर्यन खान आणि समीर वानखेडे यांच्या प्रकरणावरुन बॉलिवूड आणि मराठी सिनेसृष्टीबाबतही चर्चा सुरू झाली आहे. आर्यन खानच्या अटकेनंतर बॉलिवूडमधल्या काही कलाकारांनी शाहरुख खानचे समर्थन केले आहे तसेच त्याची भेट देखील घेतली आहे. तर दुसरीकडे समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर या देखील एक मराठी अभिनेत्री आहेत. नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर केलेल्या आरोपांबाबत क्रांती रेडकर आता थेट मैदानात उतरुन सर्व आरोपांना उत्तर देत आहेत. या सर्व प्रकरणात मराठी सिनेसृष्टीमधून कोणीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
पण सोशल मीडियावर सातत्याने व्यक्त होणाऱ्या लेखिका शेफाली वैद्य यांनी एक ट्विट करत मराठी कलाकारांवर टीका केली आहे, " मराठी सिने आणि नाट्य कलाकार ही अत्यंत भ्याड, कातडीबचाऊ, आणि एक नंबर शेपूटघालू जमात आहे. एक तरी मोठा मराठी कलाकार क्रांती रेडकरच्या बाजूने उघड बोललाय का?"
अशी भाषा वापरत त्यांनी टीका केली. पण त्यांच्या या टीकेला अभिनेता सुमित राघवन यांना अत्यंत कडक शब्दात उत्तर दिले आहे. "ह्या त्या महान बाई! सगळ्यांना अक्कल शिकवतात. आम्ही कलाकार काय ह्यांच्या बागेतल्या भाज्या खातो की आमच्या बायका/नट्या ह्यांच्या साड्या आणि टिकल्या लावतात? तुम्हाला पाठिंबा द्यायचा आहे ,जरूर द्या. पण ही कुठली भाषा? भ्याड,कातडीबचाऊ आणि शेपूटघालू जमात? Agenda नका रेटू." या शब्दात सुमित राघवन याने शेफाली वैद्य यांना समज दिली आहे.