विट्याचा लाचखोर मुख्याधिकारी ACB च्या जाळ्यात
सांगली जिल्ह्यातील विटा पालिकेचा लाचखोर मुख्याधिकारी विनायक औंधकर याला लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे.
सांगली जिल्ह्यातील विटा पालिकेचा लाचखोर मुख्याधिकारी विनायक औंधकर याला लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. बांधकाम परवान्यासाठी शहरातील एका ठेकेदाराकडून दोन लाख रुपयाची मागणी त्याने केली होती. यासंबंधीची तक्रार सदर ठेकेदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती.
दिलेल्या तक्रारीत तथ्य असल्याची खात्री करून या विभागाचे उपविभागीय अधिकारी संदीप पाटील यांनी आज सापळा रचून ही कारवाई केली. लाच घेणारा मोठा मासाच जाळ्यात सापडल्याने सामान्य नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
शहरातील इतरही कार्यालयामध्ये लाचखोरीचा प्रकार खुलेआम सुरु असून सामान्य नागरिकांना मानसिक तसेच आर्थिक त्रास सहन करावा लागत असल्याची प्रतिक्रिया येथील सामाजिक कार्यकर्ते मनोज देवकर यांनी दिली आहे. सर्वच सरकारी कार्यालयातील लाचखोरीवर नियंत्रण आणण्याची मागणी सामान्य नागरीक करत आहेत.