गेली दीड वर्ष पांच कर्मचारी महापालिका आयुक्त, महाराष्ट्र शासन यांची कुठलीही परवानगी न घेता केवळ नगर रचना विभागाचे नगररचनाकार यांच्या आशिर्वादाने बिनबोभाटपणे पालिका कर्मचारी असल्या सारखे काम करत होते. याबाबत अनेक सामाजिक संघटनांनी तक्रारी केल्या तरी त्यांच्या तक्रारी कडे दुर्लक्ष करून हे कर्मचारी काम करत होते. अखेर प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रतिनिधी स्वप्नील पाटील यांनी महापालिकेच्या नगररचना विभागात जाऊन याचा भांडाफोड केला तेंव्हा यातील एक कर्मचारी सापडला व इतर चार जण पळून गेले आहे
या सरकारी कार्यालयात जर कर्मचारी म्हणून काम करायचे असेल तर सरकार किंवा सरकारने नेमलेल्या ठेकेदारा मार्फत नियुक्त केलेले कर्मचारी सरकारी कार्यालयात काम करू शकतात आणि कार्यालयीन कागद पत्रे हाताळून त्यावर निर्णय घेऊ शकतात. मात्र अशा कुठल्याही प्रकारची नियुक्ती केली गेली नसताना उल्हासनगर महापालिकेच्या नगर रचना विभागात गेली दीड वर्ष 5 जण काम करीत होते त्यांची नावे मनीषा चंदनशिवे, कविता पवार, जगन्नाथ जगताप, राहुल जोते, किरण कुऱ्हाडे अशी या पांच कर्मचाऱ्याची नावे आहेत.
याबाबत उल्हासनगर महापालिका मुख्यालय उपायुक्त अशोक नाईकवाडे यांना विचारले असता "आम्हाला यासंदर्भात काही कल्पना नाही, ही बाब उघडकीस आल्यावर आम्ही चौकशी समिती नेमली असून त्याचा अहवाल प्राप्त होताच कारवाई करू असं उपायुक्त नाईकवाडे यांनी सांगितले
मात्र ठाणे जिल्ह्याच्या वरिष्ठ नेत्याच्या आशीर्वादाने हे सर्व सुरू होते, आता पालिका प्रशासनाच्या अंगाशी आल्याने चौकशीचा बनाव रचल्याचे बोलले जात आहे. मात्र दीड वर्ष या 5 जणांना पगार कोण देत? पगार देणारी व्यक्ती या 5 लोकांचा पगार का देत होती? त्याच्या बदल्यात ह्या 5 व्यक्ती अशी काय आणि कोणती कामे करत होती? यासंगळ्या प्रश्नांना पालिकेकडे आज तरी चौकशी व्हावी अशी मागणी सामाजिक संघटनांनी केली आहे.