पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन वर्षांपूर्वी मुंबईतल्या एका राष्ट्रीय फूटबॉलपटू मुलीचा गौरव केला होता. पण आज या मुलीवर फुटपाथवर राहण्याची वेळ आलीये. राष्ट्रीय खेळाडू असलेल्या मेरी नायडूचा आपल्या कुटुंबासह जगण्यासाठी आता संघर्ष सुरू आहे.
22 नोव्हेंबर 2017 रोजी देशभरातील अनेक वर्तमानपत्रात एका मुलीचा पंतप्रधान मोदींनीसोबतचा फोटो झळकला होता. त्यानंतर संपूर्ण देशाचं तिच्याकडे लक्ष्य वेधलं गेलं. सायन कोळीवाड्यात राहणारी मेरी प्रकाश नायडू या मुलीने देशपातळीवरील फुटबॉलच्या स्पर्धेत आपल्या असामान्य कामगिरीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. पंतप्रधानांच्या हस्ते सत्कार झाल्यानंतर मुंबईत आल्यानंतर तिच्याकडे नेत्यांची रिघच लागली होती. अनेकांनी तिला आश्वासनं दिली. पण फुटपाथवर अस्ताव्यस्त पसरलेला नायडू कुटुंबाचा संसार पाहिला की नेत्यांनी आश्वासनं कशी हवेत विरुन जातात याचा पुन्हा प्रत्यय आलाय. रहायला घर नाही आणि खेळायला मैदान नाही अशा स्थितीत मेरीचा संघर्ष सुरू आहे. रस्त्यावरच तिनं फुटबॉलचा सराव करुन स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न केला, पण महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी कारवाई मेरीच्या घरासोबत तिचा फुटबॉल आणि तिची अनेक प्रमाणपत्रही गेली.
एवढंच नाही तर मेरीची शाळेची पुस्तकही या कारवाईत गेल्यानं आता तिला शिक्षणही सोडण्याची वेळ आलीये. मेरीने आपल्या कर्तृत्वानं प्रतिकूल परिस्थितीला लाथ मारत स्वप्नांचा चेंडू उज्ज्वल दिशेने फिरवला पण अनधिकृतपणे फुटपाथवर वास्तव्य करणाऱ्या लोकांवर महापालिकेनं केलेल्या कारवाईत तिचे दहावीची पुस्तकं आणि फुटबॉल व इतर सामानही नाहीसं झालं आहे. खेळाच्या माध्यमातून देशाचं नाव उज्ज्वल करण्याचं स्वप्न विरुन गेल्याची खंत तिच्या मनातचं आहे. पण आता तिच्या दोन ळहान बहिणींची तरी करिअर व्हावं अशी तिची इच्छा आहे. त्यासाठी तिचे प्रयत्न सुरू आहेत.