औरंगाबादच्या नामांतराचा वाद सध्या राज्याच्या राजकारणात गाजतो आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नामांतरावर ठाम आहेत तर काँग्रेसने नामांतरापेक्षा विकासकामे महत्त्वाची असे सांगत आपली विरोधाची भूमिका कायम ठेवली आहे. मुख्यमंत्र्यांच्या सोशल मीडिया हँडल्सवर तर आता संभाजीनगर (औरंगाबाद) असे लिहिले जाते आहे. पण मॅक्स महाऱाष्ट्रला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीमध्ये विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी गौप्यस्फोट केला आहे.
औरंगाबादच्या नामांतराचा प्रस्ताव अजून राज्याच्या मंत्रिमंडळापुढे आलेलाच नाही, त्यामुळे नामांतराचा प्रश्नच नाही असे त्यांनी म्हटले आहे. औरंगाबादचे नामांतर व्हावे असे कुणी कितीही म्हटले तरी राज्याच्या मंत्रिमंडळापुढे हा प्रस्तावच आलेला नाही, असे पटोले यांनी स्पष्ट केले आहे. या गौप्यस्फोटामुळे नामांतरासाठी आग्रही असलेली शिवसेनेनी सत्तेत असूनही अजून प्रस्ताव का आला नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे.