मुंबईतल्या गणेशोत्सवात राजकीय पक्षांचे शक्तीप्रदर्शन

गेल्या दोन वर्षानंतर यावर्षी मुंबईसह राज्यभरात गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होतोय. पण या उत्सवावर येऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीचे परिणाम दिसू लागले आहेत. या उत्सवात मोठ्याप्रमाणात राजकीय पक्षांचे शक्तिप्रदर्शन करणारे बॅनर्स झळकू लागले आहेत. पहा मॅक्स महाराष्ट्रचा हा स्पेशल रिपोर्ट...

Update: 2022-08-31 14:19 GMT

 कोरोनाच्या गेल्या दोन वर्षांच्य़ा कालावधीनंतर यंदा मुंबईसह राज्यभरामध्ये मोठ्या जल्लोषात गणेशोत्सव साजरा होतोय.  या गणेशोत्सवाला लोकांची खुप गर्दी होतेय. लालबागसारख्या मोठ्या मंडळांमध्ये तर प्रचंड प्रमाणात आपल्याला गर्दी पाहायला मिळतेय. पण या सगळ्या गर्दीमध्ये  आपल्याला बॅनरबाजी झालेली पाहायला मिळतेय. या बॅनरबाजीमध्ये आपल्याला विविध राजकीय पक्ष शक्तिप्रदर्शन करताना पाहायला मिळत आहेत. प्रत्येक पक्ष आपापल्या परीने या गणेशोत्सवाचं श्रेय घेऊ पाहतोय. 

राज्यात सत्तापालट झाल्यानंतरचा हा पहिलाच गणेशोत्सव आणि त्यातल्या त्यात कोरोनानंतरचा देखील हा पहिलाच गणेशोत्सव हा योगायोग सत्ताधारी भाजपने सोडला नसता तरच नवल… अपेक्षेप्रमाणेच सत्ताधारी भाजपने लालबाग सारख्या प्रचंड गर्दीच्या परिसरात आपले बॅनर लावले आहेत. ज्यात देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी पाहायला मिळतायत आणि सोबत या बॅनर वर आपले सरकार आले… हिंदू सणांवरचे विघ्न टळले या ओळी पाहायला मिळतायत. इतकंच नाही तर काही लहान गणेशोत्सव मंडळांचे प्रवेशद्वार आपल्याला भाजपचे असलेले पाहायला मिळतायत. तसंही यापूर्वीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोकुळाष्टमी नंतर झालेल्या मुंबई भाजपच्या कार्यकर्त्या मेळाव्यात या सगळ्याची पूर्वकल्पना दिली होती. 

 हे झालं भाजपचं… दुसरीकडे शिवसेनेच्या शिंदेगटातील आमदारांनीही स्वतःची बॅनरबाजी करून घेतली आहे आणि शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला आहे. कुर्ल्यामध्ये प्रत्येक ठिकाणी आमदार मंगेश कुडाळकर यांनी एकनाथ शिंदे, आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो असलेले बॅनर लावून शक्तीप्रदर्शन केलेलं पाहायला मिळतं तर  लालबागमध्ये आमदार यामिनी जाधव  आणि यशवंत जाधव यांनी बॅनर लावून आपली राजकीय ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तर दुसरी कडे राष्ट्रवादी, शिवसेना उध्दव ठाकरे गट आणि मनसेचे देखील लहान लहान बॅनर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. कॉंग्रेस मात्र या सगळ्य़ापासून आपल्याला  अलिप्त राहिलेली पाहायला मिळतेय. 

अर्थात राजकीय पक्षांचा हा सगळा उपदव्याप येत्या काही काळात येऊ घातलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आहे हे न कळण्या इतपत जनताही आता दुधखुळी राहिलेली नाही. राज्यात अचानक बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे येणारी महापालिकी निवडणुक रंगतदार राहणार यात दुमत नाही पण त्याचं सावट आपल्याला सण उत्सवांवर देखील पाहायला मिळत आहे. या सगळ्याचं फलित काय़ निघतं हे आपल्याला येत्य़ा निवडणुकीमध्येच कळणार आहे.


Full View

Tags:    

Similar News