मुंबई शहरातील अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या धारावीच्या पुनर्विकास प्रकल्पाला केंद्र सरकारमुळे उशीर होत आहे, असा आरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे. बजेट अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत भाषण केले, त्यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली. गेल्या १७ वर्षांपासून रखडलेल्या धारावी पुनर्विकासाच्या मुद्द्यावर बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्राकडे बोट दाखवले. धारावीच्या पुनर्विकासाठी राज्य सरकार प्रयत्न करत असलं तरी केंद्र सरकारने जागा न दिल्याने या प्रकल्पाला वेग मंदावला आहे, अशी टीका त्यांनी केली. अनेक योजना करायच्या आहेत, पण त्यातील काही आपल्या हातात नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
बजेटवरील भाषणावर बोलताना त्यांनी हे भाष्य केले. राज्याच्या विकासाला वेग देणारा बजेट अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडले आहे, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. राज्यासह देशाच्या बजेटचा भार सोसणाऱ्या मुंबईचे रुप यापुढे तांगले असावे यादृष्टीने आपले सहकारी करत आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.