26 / 11 नंतर तरी सागरी किनारपट्टी सुरक्षित आहे का ?
रायगडच्या सागरी किनारपट्टीला परकीय विघातक कारवायांचा इतिहास आहे. रायगडचे सागरी किनारे अतिरेकी कारवाईच्या दृष्टीने संवेदनशील आहेत. या स्थितीत आज रायगडची सागरी किनारपट्टी सुरक्षित आहे का ? काय आहे या परिसरातील दहशतवादी कारवायांचा इतिहास ? जाणून घेण्यासाठी वाचा आमचे प्रतिनिधी धम्मशील सावंत यांचा विशेष रिपोर्ट.
मुंबई हे शहर नेहमीच परकिय विघातक शक्तींच्या 'हिटलीस्ट'वर असते. पण मुंबईत प्रवेश करण्यासाठी रायगडच्या सागरी किनारपट्टीवरचा वापर करण्यात येतो. याच परिसरात स्फोटक व शस्त्रास्त्र उतरवून पुढे मोठा दहशतवादी हल्ला करण्याचे मनसुबे रचले जातात. यापूर्वी झालेल्या अतिरेकी हल्ल्यांमुळे रायगडच्या सागरी किनारपट्टीला परकीय विघातक कारवायांचा इतिहास असल्याचे अधोरेखित झाले आहे. यामुळेच देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोकण किनारपट्टीची सुरक्षा अतिशय महत्वाची आहे. कोकणाला 720 किमी लांबीचा विस्तृत व अथांग सागरी किनारा लाभला आहे. रायगड जिल्ह्याला साधारणतः 122 किमी चा किनारा आहे. याच किनारापात्तीचा वापर दहशतवादी कारावाया करण्यासाठी केला जातो. 1993 च्या मुंबईवरील हल्ल्यातही रायगडच्या सागरी किनारपट्टीचा वापर केला गेला होता. श्रीवर्धन तालुक्यातील शेखाडी येथे आरडीएक्स उतरवून 'डी'गँगने मुंबईत हाह:कार माजवला होता. आमध्ये अनेक निष्पाप जीवांचा बळी गेला. त्याचीच पुनरावृती 26/11च्या घटनेत झाली होती. याच दहशतवादी घटनांच्या पार्श्वभूमीवर रायगडची सागरी सुरक्षा यंत्रणा नेहमी सतर्क असते.
उरण आणि आसपासचा परिसर हा अशा विघातक शक्तींना आपले पहिले पाऊल ठेवण्यास उपयुक्त ठरत आहे. त्याचबरोबर या परिसरात नाविक तळ, शस्त्रभंडार असल्याने अशा कारवाया उरण परिसरात होवू शकतात, याबाबत यापूर्वी सुरक्षा अधीकार्यांनी सतर्क केले आहे. त्या अनुषंगाने येथे सराव शिबीरही होत असतात. सागरी मार्गे मुंबईपासून अगदी काही अंतरावर तरीही आडबाजूला असलेल्या उरण परिसरात असलेला जंगलभाग हा संशयीतांना लपण्यासाठी उपयुक्त आहे. त्यामुळे सागरातील स्फोटक व शस्त्रास्त्र यासंबंधीत कोणतीही बातमी आली तर सुरक्षा यंत्रणा अलर्ट राहून त्या घटनेच्या मुळाशी पोहचतात, त्यामध्ये कोणतीही जोखीम पत्करताना ते दिसत नाहीत.
यापूर्वी दहशतवादी हल्ल्यासंदर्भात घडलेल्या घटना काय आहेत?
बंदुकधारी संशयित दिसल्याची माहिती आणि त्यानंतरची शोध मोहीम. उरण येथे शाळकरी मुलांनी दिलेल्या माहितीवरुन सुरू झालेली संशयीत बंदुकधार्यांची शोधमोहिम सलग दोन ते तीन दिवस सुरूच होती . यापूर्वीही येथील जंगलभागात काही संशयीत व्यक्ती वावर करुन रहात असल्याचे म्हणणे येथील स्थानिकांचे होते. त्यावेळी देखील शोधमोहिमेत नवीमुंबई पोलीस, रायगड पोलीस, नेव्ही, सीआयएसएफ यांच्या ताफ्याने उरण परिसर अक्षरश: पिंजून काढला. उरणमध्ये पहिल्यांदाच अशाप्रकारे मोठ्याप्रमाणातील शोधमोहिम राबविण्यात आली. त्यामुळे या वृत्तात सत्यता असल्याचे नागरिकांना वाटू लागले. त्यामुळे एकाबाजूला पावसाने आलेला पूर आणि अतिरेकी घुसल्याने उठलेल्या अफवांच्या लाटा यांचा सामना करत सुरक्षायंत्रणेला याबाबत तपास करावा लागला होता.
दहशतवादी अर्नाळा परिसरात तळ करण्याच्या तयारीत ?
काही दिवसांपूर्वीच ताब्यात घेतलेल्या इसिसच्या अतिरेक्यांनी आपण कर्नाळा परिसरात तळ करण्याच्या तयारीत होतो, अशी कबुली दिली होती. त्यामळे उरण व सागरी किनाऱ्यावरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. सागरी किनाऱ्याचा सोयीनुसार वापर करून स्फोटक, शस्त्रास्त्र उतरवली जातात. आणि मग मोठया अतिरेकी हल्ल्याचे गतिमान नियोजन व प्रत्यक्ष कृती होताना दिसते. मुरुड व जंजिरा येथील समुद्र व सागरी किनारा देखील याकामी चर्चेत आला आहे.
बंदुकधारी दिसल्याची माहिती आणि रायगड पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांनी परिसर काढला पिंजून
बंदुकधारी पाहिल्याची अशाच प्रकारची घटना दीड वर्षापूर्वी मुरुड तालुक्यात फणसाड अभयारण्यातही घडली होती. रायगड पोलिसांनी त्यावेळेस आठ दिवस संपूर्ण अभयारण्य परिसराची नाकाबंदी केली होती. 11 संशयीत बंदुकधार्यांना पाच ते सहाजणांनी पाहिले होते. ज्यांना नक्षलवादी भागात काम केल्याचा अनुभव आहे, असे रायगडचे पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांनी दोन दिवस अभयारण्यात तळ ठोकून या शोधमोहिमेचे नेतृत्व केले होते. यासाठी दीडशे ते दोनशे पोलीस तैनात करण्यात आले होते. मात्र यावेळी त्यातूनही काहीही निष्पन्न झालेले नव्हते.
संशयित बोट आणि सापडलेला शस्त्र साठा
दोन महिन्यांपूर्वी श्रीवर्धन तालुक्यातील हरिहरेश्वर सागरी किनाऱ्यावर आलेल्या बोटीत ए के 47 व शस्त्रास्त्र साठा असल्याचे आढळून आले होते. त्यामुळे रायगडचे सागरी किनारे अत्यंत संवेदनशील व अतिरेक्यांच्या रेकीत असल्याचे वारंवार दिसून आले आहे.
मुंबईच्या सागरी मार्गाचा वापर करीत 26 नोव्हेंबर 2008 च्या मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला 14 वर्षे पूर्ण होत आहेत. या दहशतवादी हल्ल्यात 197 निष्पाप नागरिकांचा जीव गेला होता. तर, 300 हून अधिक जण जखमी झाले होते. या हल्ल्यात मृत्यू झालेल्या नागरिकांमध्ये केवळ भारतीय नाही तर परदेशी नागरिकांचाही समावेश होता.या आत्मघाती हल्ल्यात पाकिस्तानमधून आलेल्या 10 पैकी 9 दहशतवाद्यांना भारतीय सुरक्षा यंत्रणांनी कंठस्नान घातले होते. या कारवाईमध्ये अजमल कसाब हा एकमेव दहशतवादी जिवंत पकडत त्याला फासावर लटकवले.
26/11 चा मुंबईवरील हल्ला आणि त्यानंतर सागरी सुरक्षेवर दिलेला भर काही ठराविक हंगामात कुचकामी ठरत आहे. सागरी पोलिसांना दिलेल्या गस्तीनौका पावसाळ्यात बिनकामाच्या ठरतात. या परिसरातील १२२ किमी लांबीच्या किनारपट्टी पर्यंत वाहतुकीची साधने पोहोचण्याच्या अडचणी येतात. सागरी पोलीस ठाण्यांमध्ये मनुष्यबळाच्या अभावामुळे सुरक्षा पोहचविण्यात अडचणी येतात. समुद्रामार्गे होणार्या संशयीत हालचालींची माहिती तत्काळ सुरक्षा यंत्रणेला कळावी, यासाठी नेव्ही, कोस्टगार्ड, पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने एक तत्काळ प्रतिसाद गट निर्माण करण्यात आलेला आहे.
यात स्थानिक मच्छीमार, समुद्रकिनार्यावर राहणारे रहिवासी यांचा समावेश करुन त्यांनी काही संशयीत बाबी पाहिल्यास अशाप्रकारची माहिती सुरक्षायंत्रणेला द्यावी, अशा सूचना दिलेल्या आहेत. मात्र, अनेकवेळा या यंत्रणेमध्येच हातघाई दाखविली जाते आणि अफवा पसरविल्या जातात, हे अनेकवेळा सिद्घ झालेले आहे. त्यामुळे या यंत्रणेची बांधणी सक्षमपणे होणे आवश्यक आहे, तरच तपासयंत्रणेवर पडणारा अतिरिक्त ताण कमी होईल. रायगड जिल्हयात होणार्या विविध घटनांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचा 122 कि.मी. सागरी किनारा सुरक्षितता अधिक बळकट करण्याच्या दृष्टीकोणातून अतिरेकी कारवाई/दहशतवादी हल्ले रोखण्याकरीता सर्व सागरी विभागांची सतर्कता पडताळुन पाहण्याकरीता सागरी कवच अभियान देखील राबविले जाते. या सर्व बाबी लक्षात घेऊन सुरक्षेसंदर्भात असलेल्या त्रुटी दूर करणे आवश्यक आहे. येथील सुरक्षा यंत्रणांना आवश्यक साधने मनुष्यबळ पुरवणे आवश्यक आहे. यामुळे देशाची सुरक्षा अभेद्य राहण्यास मदत होईल.....