केरळच्या डॉक्टरांना बीएमसीकडून पगाराची प्रतीक्षा

Update: 2020-07-17 13:30 GMT

कोरोनाविरोधातल्या लढाईत मुंबईतील रुग्णांवर उपचार करण्यासाठी केरळमधून आलेल्या काही डॉक्टर आणि नर्सेसना अजूनही पगार देण्यात आलेला नाही. सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये रुग्णांवर उपचार करणाऱ्या या डॉक्टर आणि नर्सेसना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागल्याचे वृत्त मॅक्स महाराष्ट्रने याआधीच दिले आहे. या कोरोना योद्ध्यांना त्यांच्या कामाचा मोबदला देखील देण्यात आलेला नव्हता.

मॅक्स महाराष्ट्रने वृत्त दिल्यानंतर महापालिकेने या डॉक्टरांना तातडीने पगार देण्यात येईल असे आश्वासन दिले. त्यातील काही डॉक्टरांना पगार देण्यातही आले. पण अजूनही काही डॉक्टरांना पगार देण्यात आलेले नाही, अशी माहिती या डॉक्टरांच्या पथकाचे प्रमुख डॉ. संतोषकुमार यांनी दिली आहे.

सेव्हन हिल्स हॉस्पिटलचे इनचार्ज रामस्वामी यांनी गुरूवारी रात्रीच पैसे डॉक्टरांच्या खात्यात NEFT द्वारे करण्यात आल्याचे सांगितले होते. पण अजूनपर्यंत पैसे या डॉक्टरांच्या खात्यात आले नसल्याचे डॉ. संतोषकुमार यांनी सांगितले आहे.

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना तज्ज्ञ डॉक्टरांची गरज असल्याने राज्य सरकारच्या एका विनंतीवर केरळ सरकारने या डॉक्टरांना मुंबईत पाठवले होते. सरकारी डॉक्टरांना मुंबईत पाठवले तर विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसतर्फे आक्षेप घेतला जाऊ शकतो या शक्यतेने केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी त्रिवेंद्रम मेडकिल कॉलेजचे सुप्रीटेंडंट डॉ. संतोषकुमार यांच्या नेतृत्वाखाली खासगी डॉक्टर आणि नर्सेसचे एक पथक मुंबईत पाठवले.

डॉ. संतोषकुमार यांनी महाराष्ट्र सरकारकडून एकही पैसा न घेता काम केले आहे. पण जे ४० डॉक्टर आपली जीव धोक्यात घालून रुग्णांवर उपचार करत आहेत त्यांना अजूनही पगार देण्यात आलेला नाही. यामध्ये ५ डॉक्टरांचा प्रत्येकी २ लाख, ३५ डॉक्टरांचे प्रत्येकी ८० हजार, ४ नर्सेसचे प्रत्येकी ३० हजार असा पगार होता. पण महापालिकेतर्फे तो देण्यात आलेला नाही. पण सेव्हन हिल्स हॉस्पिटलने काही डॉक्टर आणि नर्सेसचे पगार केले आहेत.

पण यावर आम्ही सेव्हन हिल्स हॉस्पिटलचे डीन डॉ. बाळकृण अडसूळ यांच्याशी संपर्क साधला तेव्हा, “केरळचे २९ डॉक्टर उपचारासाठी आले होते आणि उर्वरित मेडिकलच्या पोस्ट ग्रॅज्युएशनचे विद्यार्थी होते.” असे सांगितले आहे.

तर डॉ. महारुद्र कुंभार यांनी प्रतिक्रिया देताना, “मुंबई महापालिकेने कुणाचेही पैसे आतापर्यंत बुडवलेले नाहीत. या डॉक्टरांचे पैसे देण्यासाठी त्यांची नोंदणी IMC कडे करावी लागते. त्याशिवाय त्यांचे पगार देता येणार नव्हते. त्यामुळे आता २-३ दिवसात पगार केले जातील.” अशी माहिती त्यांनी दिली आहे.

केवळ केरळच्या डॉक्टरांचे पगार थकले आहेत असे नाही तर, सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या महाराष्ट्रातील इंटर्न डॉक्टरांनाही पगार मिळालेले नाहीत, अशी माहिती सूत्रांनी मॅक्स महाराष्ट्रला दिलेली आहे.

Similar News